मुंबईकर फलंदाज सूर्यकुमार यादव गेल्या काही काळात प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आणि आयपीएल मध्ये सातत्याने दमदार कामगिरी केली आहे. मुंबईकडून रणजी करंडक, विजय हजारे चषक आणि मुश्ताक अली टी२० स्पर्धेत त्याने गेल्या दोन वर्षांत धावांचा रतीब घातला होता. तर मुंबई इंडियन्सकडून आयपीएल मध्ये खेळतांना त्याने काही उपयुक्त खेळी केल्या होत्या. मात्र असे असूनही त्याला भारतीय संघात संधी मिळत नव्हती. मात्र अखेर इंग्लंड विरूद्धच्या मालिकेतून त्याची प्रतीक्षा संपुष्टात आली. इंग्लंड विरूद्धच्या टी२० सामन्यातून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. यावेळचा अनुभव त्याने नुकताच शेअर केला आहे.
“फलंदाजीला जाताना बेचैन होतो”
सूर्यकुमार यादवने मुंबई इंडियन्सच्या एका कार्यक्रमात बोलतांना आपल्या पदार्पणाच्या वेळचा अनुभव शेअर केला. तो म्हणाला, “खरंतर पदार्पणाच्या वेळी मैदानावर फलंदाजीला जातांना मी खुश नव्हतो कारण रोहित शर्मा बाद होऊन परतला होता. पण त्याचवेळी मी खूप उत्साहित देखील होतो. मी जवळपास पळत पळतच मैदानात गेलो, यावरून तुम्ही हा अंदाज बांधू शकता. मी खूप काळ प्रतीक्षा केल्याने जेव्हा पॅड बांधून डग आउट मध्ये बसलो होतो तेव्हा बेचैन होतो. जे खरंतर काहीसे गरजेचे असते. कारण तुम्हाला बेचैन वाटले नाही तर तुम्ही मैदानावर चांगले प्रदर्शन कसे करणार?”
सूर्यकुमार यादवला पदार्पणाच्या टी२० सामन्यात फलंदाजीची संधी मिळाली नव्हती. वरच्या फळीतील फलंदाजांनी इंग्लंडने दिलेले लक्ष्य सहज गाठल्याने त्याला फलंदाजीची संधी आली नाही. मात्र त्यानंतरच्या सामन्यात त्याला रोहित शर्मा बाद झाल्यावर तिसर्या क्रमांकावर फलंदाजीची संधी मिळाली. त्याचे सोने करत त्याने ३० चेंडूत ५७ धावांची बहारदार खेळी साकारली.
याबाबत बोलतांना तो म्हणाला, “मी ज्यावेळी मैदानात जात होतो, त्यावेळी खूप विचार माझ्या डोक्यात होते. तिसर्या क्रमांकावर फलंदाजी करतांना मी काय काय केले आहे, हा विचार करायला मी सुरुवात केली होती. मात्र त्यानंतर मी स्वतःला सांगितले की याबाबत फारसा विचार करू नकोस. जे आत्तापर्यंत करत आलो आहे, तेच मला करायचे आहे. त्यानंतर मी शांतचित्ताने फलंदाजी करू शकलो.” या खेळीत त्याने षटकार मारून आपले खाते उघडले होते. त्याबाबत ‘मला आर्चरच्या गोलंदाजीचा अंदाज असल्याने तो फटका मी खेळू शकलो’, असे स्पष्टीकरण त्याने दिले.
महत्त्वाच्या बातम्या-
भारताच्या ‘या’ खेळाडूंकडे आहे चिक्कार पैसा, तरीही करतात सरकारी नोकरी; काही नावं ओळखीची
‘रोहित एक दिग्गज आहे, तुझा तो दर्जा नाही’, पाकिस्तानी गोलंदाजांला ‘या’ क्रिकेटरने दाखवली पात्रता