दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियममध्ये ५ मे रोजी कुस्तीपटुंच्या दोन गटांमध्ये हाणामारी झाली होती. या चकमकीत पाच जण जखमी झाले होते. त्यापैकी राष्ट्रीय ज्युनिअर पदक विजेता कुस्तीपटू सागर धनखड याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्याच्या हत्येप्रकरणात भारताचा दोन वेळचा ऑलिंपिक पदक विजेता सुशील कुमारदेखील अडकला आहे. त्याला नुकतेच दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे.
हत्येचा आरोप लागल्यानंतर कुस्तीपटू सुशील कुमार आणि त्याचा सहकारी अजय हे दोघेही गेल्या काही दिवसांपासून फरार होते. सुशील कुमारला पकडून देण्यासाठी पोलिसांनी १ लाख रुपये, तर अजयसाठी ५० हजार रुपये बक्षीस देखील ठेवले होते. अखेर हे दोघे पंजाबमध्ये सापडल्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्यांना अटक केली. माध्यमांतील माहितीनुसार पोलिसांना सुशील कुमारचे लोकेशन पंजाबमधील बठिंडा येथे मिळाले होते. त्यानंतर शनिवारी (२२ मे) त्याला अटक झाली.
काही दिवसांपूर्वीच सुशील कुमारचा अटकपूर्व जामीन अर्ज देखील फेटाळण्यात आला होता. त्यामुळे त्याला अटक होणार हे निश्चित होते.
भारताचा सर्वात यशस्वी कुस्तीपटू आहे सुशील
सुशील कुमारने २००८ बीजिंग ऑलिंपिकमध्ये कांस्य पदक मिळवून देशाला ५६ वर्षांनंतर कुस्तीमध्ये ऑलिम्पिक पदक मिळवून दिले होते. २०१२ लंडन ऑलम्पिकमध्ये त्याने रौप्य पदक आपल्या नावे केलेले. सुशीलने सलग तीन राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. त्याला भारत सरकारकडून सर्वोत्कृष्ट खेळाडूला दिला जाणारा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार व अर्जुन पुरस्कार दिला गेला आहे. तसेच, भारतातील चौथा सर्वात मोठा नागरी सन्मान पद्मश्री देखील त्याच्या नावे आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
केवळ ५० रुपयांनी झाली ‘हिटमॅन’च्या क्रिकेट प्रशिक्षणाला सुरुवात; अशी आहे रोहितची संघर्षगाथा
‘असा’ करायचा ट्रोलिंगचा सामना, पृथ्वी शॉने सांगितला मार्ग
‘द वॉल’ राहुल द्रविड का ठरु शकतो भारतीय क्रिकेट संघाचा उत्तम प्रशिक्षक, वाचा ३ प्रमुख कारणे





