भारताचा स्टार कुस्तीपटू सुशील कुमारने दोन वेळा ऑलिंपिक पदकं जिंकली आहेत. तो दोन ऑलिंपिक पदके जिंकणारा भारताचा पहिलाच खेळाडू आहे. विशेष म्हणजे तो 2002 च्या मँचेस्टर राष्ट्रकुल स्पर्धेदरम्यान मॅटवरील कुस्ती खेळणे सोडणार होता, असे त्याने एका वेबीनारमध्ये सांगितले होते.
द ट्रिब्यूनने दिलेल्या वृत्तानुसार मँचेस्टर येथे झालेल्या 2002 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुशील कुमारची निवड झाली नव्हती. त्याच्याऐवजी शोकिंदर तोमरला भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली होती.
त्यावेळी तत्कालीन क्रीडामंत्री उमा भारती यांनी जाहीर केलेल्या पदक विजेत्यांच्या रोख पारितोषिकांकडे सुशीलचे लक्ष होते, कारण तो एका अल्प उत्पन्न असलेल्या कुटूंबाचा भाग होता. त्यावेळी सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदक विजेत्यांना अनुक्रमे 20 लाख, 15 लाख आणि 10 लाख असे बक्षीस मिळणार होते.
याबद्दल एका विद्यापीठाने आयोजित केलेल्या वेबीनारमध्ये सुशील कुमारने सांगितले होते की ‘माझे नाव जेव्हा काढून टाकण्यात आले, तेव्हा मी रडलो होतो. मी एका अल्प उत्पन्न असलेल्या कुटुंबातून आलो होतो, त्यामुळे बक्षीस रक्कम मिळाली असती तर माझ्या अनेक समस्या सुटल्या असत्या.’
तो पुढे म्हणाला होता, ‘जेव्हा माझ्याऐवजी दुसऱ्यांची निवड झाली तेव्हा मी मॅटवरील कुस्ती सोडण्याचा निर्णय घेतला होता आणि उपजीविकेसाठी दंगलवर लक्ष केंद्रित केले होते. पण माजी कुस्तीपटू उदय चंदजींनी मला सांगितले की ‘हिमंत हारु नको, तूला माहितही नसेल, कदाचीत तुला यापेक्षाही मोठ्या स्तरावर कामगिरी बजावण्याची संधी मिळाले.’ त्यावेळी मी त्यांचे ऐकले ते बरे झाले. मी नेहमी माझ्या जवळच्या लोकांना ही घटना सांगतो.’
नंतर सुशीलने कुस्ती कायम करण्याचा निर्णय योग्य असल्याचेही सिद्ध केले. त्याने 2008 च्या ऑलिंपिकमध्ये कांस्य आणि 2012 च्या ऑलिंपिकमध्ये रौप्य पदकाची कमाई केली. तसेच त्याने 2010, 2014 आणि 2018 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत प्रत्येकी सुवर्णपदकाची कमाई केली. तसेच 2010 च्या विश्व कुस्ती चॅम्पियनशीपमध्ये ही त्याने सुवर्णपदकाला गवसणी घातली.
त्याला पद्मश्री, राजीव गांधी खेलरत्न आणि अर्जून पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
बजरंग पुनिया व्यतिरिक्त अन्य कुस्तीपटूंना मिळाली दिवाळीची सुट्टी
…म्हणून बजरंग पुनिया आणि संगिता फोगटचे होणार नाही धुमधडाक्यात लग्न
विश्व कुस्ती चॅम्पियनशीप २०२० ऐवजी होणार ‘ही’ स्पर्धा, UWW चा मोठा निर्णय