स्विस ओपन 2024 बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत भारताचा अनुभवी खेळाडू किदाम्बी श्रीकांतचा पराभव झाला. यासह भारताचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलंय.
जागतिक क्रमवारीतील माजी अव्वल खेळाडू श्रीकांतला तैवानच्या लिन चुन-यीकडून एक तास पाच मिनिटे चाललेल्या सामन्यात 21-15, 9-21, 18-21 असा पराभव पत्करावा लागला. 2022 मध्ये जर्मनीच्या हायलो ओपन सुपर 300 नंतर कोणत्याही BWF टूर इव्हेंटमध्ये 31 वर्षीय श्रीकांतनं एवढी लांब मजल मारण्याची ही पहिलीच वेळ होती. श्रीकांतनं नोव्हेंबर 2022 नंतर प्रथमच BWF सेमीफायनलमध्ये प्रवेश केला होता.
श्रीकांतनं सामन्याची सुरुवात चांगली करत सुरुवातीला आघाडी घेतली. यानंतर त्यानं आघाडी 11-5 अशी वाढवली आणि पहिला गेम 21-15 असा जिंकला. दुसऱ्या गेममध्येही श्रीकांतनं सुरुवातीपासूनच 4-1 अशी आघाडी घेतली. पण त्यानंतर लिननं आपलं आक्रमण वाढवलं आणि पुढील नऊपैकी आठ गुण जिंकून 9-5 अशी आघाडी घेतली. लिननं दुसरा गेम 21-9 ने जिंकत सामना तिसऱ्या गेमपर्यंत नेला.
अंतिम गेममध्ये लिननं चांगली सुरुवात करत 6-2 अशी आघाडी घेतली. श्रीकांतनं पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. 6-6 असा स्कोअर झाल्यानंतर दोघंही एका-एका गुणासाठी झगडत होते. मात्र, 16-16 अशी बरोबरी साधल्यानंतर लिननं सलग तीन गुण जिंकून 19-16 अशी आघाडी घेतली. यानंतर लिननं दुसरा मॅच पॉइंट जिंकून सामना आपल्या खिशात घातला. आता अंतिम फेरीत लिन चुन यीचा याचा सामना जागतिक क्रमवारीत 15 व्या स्थानावर असलेल्या चाऊ तिएन चेनशी होईल.
स्विस ओपनमध्ये भारताकडून केवळ किदाम्बी श्रीकांतचं आव्हान शाबूत होतं. प्रियांशु राजावत आणि किरण जॉर्ज उपांत्यपूर्व फेरीतून बाहेर पडले. तर महिला दुहेरीत त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीलाही उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्कारावा लागला. तर महिला एकेरीत आघाडीची खेळाडू पीव्ही सिंधूची मोहीम दुसऱ्या फेरीतत संपुष्टात आली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
आता रणजी खेळाडूंचेही ‘अच्छे दिन’ येणार! बीसीसीआयकडून लवकरच मोठी घोषणा
नरेंद्र मोदी स्टेडियम नाही तर ‘या’ मैदानावर होऊ शकतो IPL 2024 चा अंतिम सामना; लवकरच घोषणा
लिलावात विकल्या न गेलेल्या खेळाडूनं पदार्पणातच ठोकलं अर्धशतक! हैदराबादच्या गोलंदाजांची नाचक्की