---Advertisement---

सिडनी सिक्सर्सचा बिग बॅशच्या अंतिम फेरीत प्रवेश, जेम्स व्हिन्सची खेळी ठरली निर्णायक

On: शनिवार, जानेवारी 30, 2021 10:52 PM
---Advertisement---

सिडनी सिक्सर्सने बिग बॅश लीग २०२१ च्या क्वालिफायरमध्ये पर्थ स्कॉर्चर्सला ९ गडी राखून पराभूत करत अंतिम फेरीत धडक मारली. पर्थ स्कॉर्चर्सने प्रथम फलंदाजी करताना १६७ अशी सन्मानजनक धावसंख्या उभारली होती. सिडनी सिक्सर्सने १७ व्या षटकात एक गडी गमावून आरामात विजय मिळविला. ९८ धावांच्या तुफानी खेळीसाठी जेम्स व्हिन्सला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.

स्कॉर्चर्सने उभारली सन्मानजनक धावसंख्या

पहिल्या क्वालिफायरमध्ये पर्थ स्कॉर्चर्सने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. परंतु हा निर्णय चुकीचा ठरला आणि पॉवरप्लेमध्येच संघाने सलामीवीर जेसन रॉय आणि लियाम लिव्हिंग्स्टन यांचे बळी गमावले. त्यानंतर, जोश इंग्लिसने कोलिन मुन्रो व आणि कर्णधार एश्टन टर्नर यांच्यासमवेत छोटेखानी मात्र महत्त्वपूर्ण भागीदार्या केल्या. जोश इंग्लिसने ४१ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांसह ६९ नाबाद खेळी केली. सिक्सर्सकडून अष्टपैलू बेन द्वारशीसने दोन बळी मिळवले.

व्हिन्सची धमाकेदार खेळी आणि सिक्सर्स अंतिम फेरीत

स्कॉर्चर्सने दिलेल्या १६८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गतविजेत्या सिडनी सिक्सर्सचे सलामीवीर जोश फिलिप आणि जेम्स व्हिन्सने पहिल्या गड्यासाठी ८.५ षटकांत ९२ धावा झोडल्या. फिलिपच्या रूपाने सिक्सर्सला पहिला धक्का बसला. त्याने, २८ चेंडूत ४५ भावांची तुफानी खेळी केली. फिलिप बाद झाल्यानंतरही व्हिन्स थांबला नाही आणि त्याने १७ षटकांत कर्णधार डॅनियल ह्युजसोबत ७६ धावांची नाबाद भागीदारी करत संघाला अंतिम फेरीत स्थान मिळवून दिले. व्हिन्सने ५३ चेंडू नाबाद ९८ धावा ठोकल्या. ज्यात १४ चौकार व एका षटकारासह समावेश होता. सिक्सर्सला विजयासाठी एक व व्हिन्सला शतकासाठी दोन धावा हव्या असताना अँड्र्यू टायने वाईड चेंडू टाकत सामना संपविला.

स्कॉर्चर्सला मिळणार आणखी एक संधी

सिडनी सिक्सर्सने या विजयासह एकूण पाचव्यांदा बीबीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. दुसरीकडे, पर्थ स्कॉर्चर्सने बीबीएलच्या साखळी फेरीत अव्वल २ संघात समाप्ती केल्यामुळे ते अद्यापि स्पर्धेतून बाहेर पडले नाहीत. त्यांना अंतिम फेरी गाठण्याची आणखी एक संधी मिळणार आहे. ४ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या चॅलेंजर्स सामन्यातील विजेत्यांशी त्यांना दोन हात करावे लागतील.

महत्वाच्या बातम्या:

भाऊ सॉरी ना..! फलंदाजाचं शतक अडवण्यासाठी पठ्ठ्याने टाकला वाईड बॉल, नंतर स्वत:च मागितली माफी

मोठी बातमी.! जय शाह यांची आशियाई क्रिकेट कौन्सिलच्या अध्यक्षपदी नियुक्ती

वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी बांग्लादेश संघाची घोषणा, २ नवख्या खेळाडूंना मिळाली जागा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---