बीसीसीआयने भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात रोमांचक सय्यद मुश्ताक अली टी२० स्पर्धेच्या आयोजनाच्या तारखा घोषित केल्या आहेत. न्यूज एजन्सी एएनआयच्या अहवालानुसार सय्यद मुश्ताक अली टी२० स्पर्धा १० जानेवारी ते ३१ जानेवारी २०२१ दरम्यान होणार आहे. ६ वेगवेगळ्या राज्यांमध्ये ही स्पर्धा खेळली जाईल. बीसीसीआय लवकरच या स्पर्धेच्या पूर्ण वेळापत्रकाची घोषणा करेल. या स्पर्धेत सहभागी होणारे सर्व खेळाडू २ जानेवारी रोजी जैव सुरक्षित वातावरणात एकत्रित येतील.
बीसीसीआयने या टी२० स्पर्धेच्या आयोजनाची माहिती राज्य संघटनांना दिली आहे. तर या स्पर्धेशी संबंधित सर्व सदस्यांना योग्य वेळेला उर्वरित माहिती देण्यात येईल. तसेच येत्या काही दिवसांत स्पर्धेत सहभागी सर्व संघ आपापल्या कर्णधारांच्या नावाची घोषणा करणार आहेत. प्रियम गर्गला सय्यद मुश्ताक अली टी२० स्पर्धेच्या उत्तर प्रदेश संघाचे नेतृत्त्वपद मिळण्याची शक्यता आहे. तसेच माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना या संघाचा भाग असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
आयपीएल २०२१ लिलावासाठी होणार मदत
कोविड-१९ या महामारीचा फटका सय्यद मुश्ताक अली टी२० स्पर्धेलाही बसला होता. याच कारणामुळे या स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात उशीर झाला आहे. तरीही या स्पर्धेमुळे आयपीएल २०२१ साठीच्या लिलावात मोठी मदत मिळू शकते. माध्यमातील वृत्तांनुसार, बीसीसीआय फेब्रुवारी महिन्यात आयपीएल २०२१चा लिलाव आयोजित करु शकते. यावेळी ८ ऐवजी एकूण १० संघ सहभागी होण्याची शक्यता आहे. अशात कित्येक अनकॅप भारतीय खेळाडूंना संधी मिळेल. यासाठी सय्यद मुश्ताक अली या टी२० स्पर्धेची मदत मिळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
रिषभ पंत दुसरा ऍडम गिलख्रिस्ट! माजी भारतीय क्रिकेटरची मोठी प्रतिक्रिया
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडचा भारतीय फलंदाजांना इशारा, म्हणाला…
NZvsWI: दुसऱ्या कसोटीतही वेस्ट इंडीजची दयनीय अवस्था; होऊ शकतो डावाने पराभव