यावर्षी १० जानेवारीपासून सय्यद मुश्ताक अली टी२० स्पर्धा सुरु होत आहे. या स्पर्धेसाठी सध्या सर्व राज्यसंघटना आपापल्या संघांच्या घोषणा करत आहेत. नुकतेच शुक्रवारी(१ जानेवारी) उत्तर प्रदेश संघाचीही पहिल्या २ सामन्यांसाठी घोषणा करण्यात आली आहे. या संघाचा कर्णधार २० वर्षीय प्रियम गर्गला करण्यात आले आहे.
त्याचबरोबर या संघात सुरेश रैना आणि भुवनेश्वर कुमार या खेळाडूंचाही समावेश आहे. रैना या स्पर्धेतून जवळपास दीड वर्षांनी क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहे. तो व्यावसायिक क्रिकेट याआधी शेवटचे २०१९ च्या आयपीएलमध्ये खेळला आहे. त्यानंतर त्याने कोणतेही क्रिकेट खेळलेले नाही.
तसेच भुवनेश्वर कुमारही दुखापतीनंतर क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहे. त्याला आयपीएल २०२० च्या मोसमादरम्यान मांडीची दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यालाही मुकावे लागले. असे असले तरी अजून त्याच्या तंदुरुस्तीबाबत बीसीसीआयकडून पुष्टी मिळालेली नाही.
प्रियम गर्गने केले आहे १९ वर्षांखालील संघाचे नेतृत्व –
प्रियम गर्गने साल २०२० मध्ये झालेल्या १९ वर्षांखालील विश्वचषकात भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. त्याने त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला अंतिम सामन्यापर्यंत पोहचवले होते. मात्र अंतिम सामन्यात भारताला बांगलादेशविरुद्ध पराभव स्विकारावा लागल्याने उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. याशिवाय गर्गने आयपीएलमध्ये २०२०च्या मोसमातून सनरायझर्स हैदराबाद संघाकडून पदार्पण केले आहे.
या खेळाडूंचाही उत्तर प्रदेश संघात समावेश –
सय्यद मुश्ताक अली टी२० स्पर्धेसाठी उत्तर प्रदेश संघात रैना, गर्ग, भुवनेश्वर व्यतिरिक्त रिंकू सिंग, शिवम मावी, अंकित राजपूत, ध्रेव जोरेल, कर्ण शर्मा अशा खेळाडूंचाही समावेश आहे.
या ठिकाणी होणार सामने –
१० ते २० जानेवारीपर्यंत या स्पर्धेतील साखळी सामने होतील. २० जानेवारीपासून बाद फेरीचे सामने होतील. सर्व संघांची ६ गटात विभागणी करण्यात आली आहे. यातील ५ गट एलीट तर एक प्लेट गट आहे. प्रत्येक एलीट गटात ६ संघ आहेत, तर प्लेट गटात ८ संघ आहेत. साखळी फेरीतील सामने मुंबई, चेन्नई, कोलकाता, इंदोर, चेन्नई आणि बडोदा येथे होईल. तर उपांत्य सामने आणि अंतिम सामना अहमदाबादमध्ये होईल. ३१ जानेवारीला अंतिम सामना पार पडेल.
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक संघातील खेळाडूंना २ जानेवारीपर्यंत आपापल्या जैव सुरक्षित वातावरणात पोहचावे लागले.
असा आहे उत्तर प्रदेश संघ –
प्रियम गर्ग, कर्ण शर्मा, सुरेश रैना, रिंकू सिंग, माधव कौशिक, समर्थ सिंग, शुभम चौबे, ध्रुव जोरेल, आर्यन जुयाल, भुवनेश्वर कुमार, अंकित राजपूत, मोहसिन खान, शिवम मावी, शिवा सिंग, शानू सैनी
महत्त्वाच्या बातम्या –
रहाणे-गिलचे जबरा शॉट पाहून पाँटिंगची बोलती बंद; म्हणाला, “ऑसी फलंदाजांमध्ये दमच नाही”
कोरोना इफेक्ट : सिडनी येथील भारत-ऑस्ट्रेलिया तिसऱ्या कसोटीपूर्वी केल्या जात आहेत ‘या’ उपाययोजना
रहाणेने सुट्ट्यांमध्ये ‘हे’ काम केलं, म्हणूनच त्याच्या फलंदाजीत सुधारणा झाल्या, प्रशिक्षकाचा खुलासा