दुबई। टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत रविवारी (३१ ऑक्टोबर) भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सामना झाला. या सामन्यात न्यूझीलंडने ८ विकेट्सने विजय मिळवला आणि स्पर्धेतील गुणांचे खाते उघडले. मात्र, भारतासाठी या पराभवामुळे पुढील मार्ग आणखी खडतर झाला आहे.
या सामन्यात भारताने २० षटकांत ७ बाद ११० धावा केल्या आणि न्यूझीलंडला विजयासाठी १११ धावांचे आव्हान दिले होते. न्यूझीलंड संघाने हे आव्हान १४.३ षटकांत २ विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले.
भारताने दिलेल्या १११ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडकडून मार्टिन गप्टील आणि डॅरिल मिशेल सलामीला फलंदाजीला उतरले होते. त्यांनी सुरुवात चांगली करण्याचा प्रयत्न केला, पण गप्टील १७ चेंडूत २० धावा करुन चौथ्या षटकात जसप्रीत बुमराहविरुद्ध खेळताना झेलबाद झाला. त्याचा झेल शार्दुल ठाकूरने घेतला. पण यानंतर डॅरिल मिशेलने कर्णधार केन विलियम्सनबरोबर अर्धशतकी भागीदारी रचत संघाला मजबूत स्थितीत उभे केले.
मात्र, डॅरिल मिशेल १३ व्या षटकात जसप्रीत बुमराह विरुद्धच खेळताना केएल राहुलकरवी झेलबाद झाला. त्याचे अर्धशतक केवळ १ धावेने हुकले. तो ३५ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांसह ४९ धावा करुन बाद झाला. तो बाद झाल्याने त्याची आणि विलियम्सनची ७२ धावांची भागीदारी तुटली. पण, अखेर विलियम्सनने डेवॉन कॉनवेच्या साथीने न्यूझीलंडला विजय मिळवून दिला. विलियम्सनने नाबाद ३३ धावा केल्या. तसेच डेवॉन कॉनवे २ धावांवर नाबाद राहिला. भारताकडून केवळ जसप्रीत बुमराहने दोन विकेट्स घेतल्या.
भारताची फलंदाजी कोलमडली
न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाची सुरुवात फारशी खास झाली नाही. भारताकडून या सामन्यासाठी इशान किशन आणि केएल राहुलने डावाची सुरुवात केली होती. पण, भारताने तिसऱ्या षटकातच पहिला धक्का ट्रेंट बोल्टने दिला. त्याने इशानला ४ धावांवर डॅरिल मिशेलकडे झेल देण्यास भाग पाडले. त्याच्या पुढच्याच चेंडूवर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या रोहित शर्माचा झेल ऍडम मिल्नेकडून सुटला.
पण, त्याला जीवदानाचा फारसा उपयोग करता आला नाही. रोहित १४ चेंडूत १ चौकार आणि १ षटकार मारुन ८ व्या षटकात इश सोधीच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याच्या झेल मार्टिन गप्टीलने घेतला. त्याच्याआधी केएल राहुलने ६ व्या षटकात टीम साऊथी विरुद्ध खेळताना डॅरिल मिशेलकडे झेल देत विकेट गमावली. त्याने १८ धावा केल्या. भारताने १० षटकात ३ बाद ४८ धावाच केल्या होत्या.
यानंतर ११ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर विराट कोहलीला इश सोधीने ट्रेंट बोल्टकडे झेल देण्यास भाग पाडले. विराट ९ धावा करुन बाद झाला. याबरोबरच आंतरराष्ट्रीय टी २०मध्ये विराटला ३ वेळा बाद करणारा इश सोधी पहिलाच गोलंदाज ठरला. यानंतर हार्दिक पंड्या आणि रिषभ पंतने भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण रिषभला ऍडम मिल्नेने १२ धावांवर त्रिफळाचीत केले.
यानंतर १९ व्या षटकात भारताला दुहेरी धक्का बसला. हार्दिक पंड्या आणि शार्दुल ठाकूर यांनी या षटकात ट्रेंट बोल्टविरुद्ध खेळताना विकेट्स गमावल्या. हार्दिकने २४ चेंडूत २३ धावा केल्या. शार्दुल तर शुन्यावरच बाद झाला. अखेर रविंद्र जडेजाने आक्रमक फटके मारले. त्यामुळे भारताला १०० धावांचा आकडा पार करता आला. भारताने २० षटकांअखेर ७ बाद ११० धावा केल्या.
न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्टने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच इश सोधीने २ विकेट्स घेतल्या. टीम साऊथी आणि ऍडम मिल्नेने प्रत्येकी १ विकेट घेतली.
असे आहेत दोन्ही संघ
या सामन्यासाठी भारताने अंतिम ११ जणांच्या संघात २ बदल केले असून सुर्यकुमार यादव या सामन्यासाठी पाठीच्या दुखापतीमुळे उपलब्ध नाही. त्याच्याऐवजी इशान किशनला संधी देण्यात आली आहे. तसेच, भुवनेश्वर कुमार ऐवजी शार्दुल ठाकूरला संघात संधी देण्यात आली आहे. त्याबरोबर या सामन्यात न्यूझीलंडने अंतिम ११ जणांच्या संघात १ बदल केला आहे. त्यांनी टीम सिफर्ट ऐवजी ऍडम मिल्नेला संघात संधी दिली आहे.
???? UPDATE: Suryakumar Yadav complained of back spasms. He has been advised rest by the BCCI Medical Team and has stayed back at the team hotel.#TeamIndia #T20WorldCup #INDvNZ
— BCCI (@BCCI) October 31, 2021
असे आहेत ११ जणांचे संघ –
भारत – इशान किशन, रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली (कर्णधार), रिषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह
न्यूझीलंड- मार्टिन गप्टिल, डॅरिल मिशेल, केन विलियम्सन (कर्णधार), जेम्स नीशम, डेव्हॉन कॉनवे, ग्लेन फिलिप्स (यष्टीरक्षक), मिचेल सँटनर, ईश सोधी, टीम साऊदी, ऍडम मिल्ने, ट्रेंट बोल्ट






