बांगलादेश टी-20 वर्ल्ड कप 2026 मधून बाहेर पडल्यानंतर पाकिस्तानची तडफड सुरू आहे. आयसीसीसोबत (ICC) झालेल्या बैठकीत बांगलादेशला पाठिंबा देणारा पाकिस्तान हा एकमेव देश होता. बांगलादेश बाहेर पडल्यानंतर पाकिस्ताननेही या स्पर्धेत सहभागी न होण्याची धमकी दिली होती.
तरीही, पीसीबी (PCB) प्रमुख मोहसिन नकवी यांनी म्हटले होते की, यावर अंतिम निर्णय सरकार घेईल. वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानच्या संघाची घोषणा झाली आहे. आता असे रिपोर्ट समोर येत आहेत की, पाकिस्तान स्पर्धेत तर खेळेल, पण 15 फेब्रुवारीला भारताविरुद्ध होणाऱ्या सामन्यावर बहिष्कार टाकू शकतो.
खरे तर, ‘जिओ न्यूज’नुसार, पाकिस्तान टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये टीम इंडियाविरुद्ध होणाऱ्या सामन्याचा बहिष्कार करण्याची योजना आखत आहे. दोन्ही संघांमधील हा सामना 15 फेब्रुवारीला श्रीलंकेतील कोलंबो येथे खेळवला जाणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकून आयसीसीच्या निर्णयाविरुद्ध आपला निषेध नोंदवण्याच्या तयारीत आहे.
आपले सामने भारतातून दुसऱ्या ठिकाणी हलवण्याच्या बांगलादेशने आयसीसीला केलेल्या विनंतीला पाकिस्तानने पूर्ण पाठिंबा दिला होता. पीसीबी प्रमुखांनी बांगलादेशला विश्वचषकातून बाहेर काढण्याचा निर्णय पूर्णपणे चुकीचा असल्याचे म्हटले होते.
विशेष म्हणजे, बांगलादेशने सुरक्षेचे कारण देत आपला संघ भारतात पाठवण्यास नकार दिला होता. त्यानंतर आयसीसीने बांगलादेशच्या जागी स्कॉटलंडला टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळण्याचे तिकीट दिले आहे. आयसीसीच्या या निर्णयाचा मोहसिन नकवी यांनी निषेध केला होता. त्याचबरोबर त्यांनी असेही म्हटले होते की, पाकिस्तान टी-20 विश्वचषकात सहभागी होणार की नाही, याचा अंतिम निर्णय देशाचे पंतप्रधान शहबाज शरीफ घेतील, जे सध्या परदेश दौऱ्यावर आहेत.






