इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जॉस बटलरने सोमवारी (१ नोव्हेंबर) खेळल्या गेलेल्या श्रीलंका आणि इंग्लड यांच्यातील सामन्यात जबरदस्त प्रदर्शने केले. बटलरने या सामन्यात त्याचे टी२० विश्वचषकातील पहिले शतक साकारले. बटलरच्या ६७ चेंडूतील १०१ धावांच्या जोरावर इंग्लंडने सन्मानजनक धावसंख्या उभारली आणि श्रीलंकेवर विजय मिळवला. श्रीलंका संघाला २६ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. जॉस बटलरने या सामन्यात केलेल्या प्रदर्शनाचे सर्वत्र कौतुक होत आहे. अशात ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज शेन वॉर्ननेही बटलरला शाबासकी दिली आहे.
इंग्लंड संघ टी२० विश्वचषकाच्या सुरुवातीपासून उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसत आहे. यामध्ये जॉस बटलरचीही महत्त्वाची भूमिका राहिली आहे. बटलरने श्रीलंकेविरुद्ध सोमवारी झालेल्या सामन्यात सहा चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने त्याचे शतक पूर्ण केले. त्याने हे शतक डावाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार मारून केले, ज्यामुळे चाहत्यांमध्ये त्याची चांगलीच चर्चा होत आहे.
बटरलच्या विश्वचषकातील प्रदर्शनाकडे पाहून शेन वॉर्नने त्याची तुलना दिग्गज फलंदाज विव रिचर्ड्स यांच्यासोबत केली आहे. शेन वॉर्नने त्याच्या अधिकृत ट्वीटर खात्यावरून एक पोस्ट शेअर करत ही तुलना केली आहे.
शेन वॉर्नने ट्वीटमध्ये लिहिले की, “ऑस्ट्रेलियाला जात आहे. विमानतळावर मी टी२० विश्वचषकाचे हायलाइट्स पाहिले. अप्रतिम ! बटलरने एकदा पुन्हा दाखवून दिले की, टी-२० विश्वचषकात फलंदाजी कशी केली जाते. माझ्या मते तो पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमधील (मर्यादीत षटकांचे क्रिकेट) सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक आहे आणि नक्कीच इंग्लंडचा आतापर्यंतचा अप्रतिम फलंदाज. तो विवियन रिचर्ड्सप्रमाणे विध्वंसक खेळ करतो.”
En route to Oz & in transit watching #ICCT20WorldCup2021 highlights ! Wow @josbuttler again showing how to bat in T/20 cricket. I think he’s one of the best white ball players of all time & definitely England’s best ever player ! Very similar destruction as the great Viv !
— Shane Warne (@ShaneWarne) November 1, 2021
दरम्यान, इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात पार पडलेल्या सामन्यात इंग्लंडने २६ धावांनी विजय मिळवला. श्रीलंकेने नाणेफेक जिंकली आणि इंग्लंडला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. इंग्लंडने बटरलच्या दमदार खेळीच्या जोरावर २० षटकांमध्ये चार विकेट्सच्या नुकसानावर १६३ धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ १९ व्या षटकात १३७ धावा करून सर्वबाद झाला आणि इंग्लंडने सामना जिंकला.
इंग्लंडने या विजयासह विश्वचषकातील त्याच्या पहिल्या चार सामन्यात सलग विजय मिळवला आहे. इंग्लंड संघ स्पर्धेच्या उपांत्य सामन्यामध्ये जवळपास दाखल झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
जॉस बटलरच्या आक्रमक खेळीने बेन स्टोक्सही भलताच प्रभावित; ट्वीट करत म्हटला…
‘टी२० विश्वचषकही आयपीएलसमोर फिका वाटतो,’ सुनिल गावसकरांचे मोठे वक्तव्य