अफगाणिस्ताननं आपल्या टी20 विश्वचषक मोहिमेला धमाकेदार सुरुवात केली आहे. गयाना येथे झालेल्या 5व्या सामन्यात त्यांनी युगांडाचा 125 धावांनी पराभव केला. अफगाणिस्ताननं प्रथम फलंदाजी करताना रहमानउल्ला गुरबाज आणि इब्राहिम झद्रान यांच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर 20 षटकांत 5 विकेट गमावून 183 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, युगांडाचा संघ 16 षटकांत केवळ 58 धावांवर ऑलआऊट झाला.
युगांडाच्या संघानं नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला, मात्र अफगाणिस्तानच्या सलामी फलंदाजांनी त्यांचा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरवला. रहमानउल्ला गुरबाज आणि इब्राहिम झद्रान यांनी शानदार फलंदाजी करत पहिल्या विकेटसाठी अवघ्या 14.3 षटकात 154 धावांची उत्कृष्ट भागीदारी केली. रहमानउल्ला गुरबाज अतिशय स्फोटक अंदाजात दिसला. त्यानं अवघ्या 45 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीनं 76 धावांची खेळी केली. इब्राहिम झद्राननंही 46 चेंडूंत 9 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीनं 70 धावा केल्या.
मात्र, हे दोघं बाद होताच अफगाणिस्तानचा डाव गडगडला. एकवेळ असं वाटत होतं की संघ 200 हून अधिक धावा करेल मात्र त्यांना शेवटच्या 5 षटकात केवळ 27 धावा करता आल्या.
184 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना युगांडाची सुरुवात खूपच खराब झाली. त्यांचे फलंदाज अफगाणिस्तानच्या गोलंदाजांसमोर पूर्णपणे असहाय दिसले. फजलहक फारुकीनं युगांडाला पहिल्याच षटकात दोन मोठे धक्के दिले. यानंतर युगांडानं 21 धावांत 5 विकेट गमावल्या आणि येथून त्यांचा पराभव निश्चित झाला.
अफगाणिस्तानच्या गोलंदाजांसमोर युगांडाचा एकही फलंदाज टिकू शकला नाही. त्यांचे एक एक करून सर्व फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतत राहिले आणि अफगाणिस्ताननं सहज विजय मिळवला. अफगाणिस्तानसाठी फझलहक फारुकीनं शानदार गोलंदाजी करत 4 षटकात केवळ 9 धावा देत 5 बळी घेतले. याशिवाय नवीन उल हक आणि मुजीब उर रहमान यांनीही चांगली गोलंदाजी केली.
महत्त्वाच्या बातम्या –
पाकिस्तानच्या हसन अलीचं पुन्हा एकदा हसं! विकेट घेतल्यानंतर सेलिब्रेशन करताना झाली दुखापत; पाहा VIDEO
आयर्लंडला हलक्यात घेणं परवडणारं नाही, टीम इंडियासाठी ‘हे’ 5 खेळाडू ठरू शकतात धोकादायक
93 कोटींची एकूण बक्षीस रक्कम, विजेत्यावर होणार पैशांचा वर्षाव; टी20 विश्वचषकातून कोणताही संघ रिकाम्या हातानं परतणार नाही!