टी20 विश्वचषक 2024 चा 17 वा सामना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात शनिवारी रात्री 8 जून रोजी बार्बाडोसमधील केन्सिंग्टन ओव्हल येथे खेळला गेला. या सामन्यात ॲडम झम्पाच्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर कांगारूंनी 36 धावांनी विजय मिळवला.
या विश्वचषकातील ऑस्ट्रेलियाचा हा सलग दुसरा विजय आहे. या विजयासह सुपर-8 मध्ये पोहोचण्याच्या त्यांच्या आशा आणखी बळकट झाल्या आहेत. तर इंग्लंडच्या संघाला अद्याप एकही विजय नोंदवता आलेला नाही. स्कॉटलंडविरुद्धचा त्यांचा पहिला सामना पावसामुळे वाहून गेला होता. आता पुढील फेरी गाठण्यासाठी इंग्लंडला आपले उर्वरित दोन्ही सामने मोठ्या फरकानं जिंकावे लागतील.
नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियानं निर्धारित 20 षटकात 7 गडी गमावून 201 धावा केल्या. या विश्वचषकात प्रथमच कोणत्या तरी संघाला 200 धावांचा टप्पा ओलांडण्यात यश आलं. मात्र विशेष म्हणजे, या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या एकाही फलंदाजाला अर्धशतक झळकवता आलं नाही, डेव्हिड वॉर्नरनं 39, ट्रॅव्हिस हेडनं 34, मिशेल मार्शनं 35 आणि मार्कस स्टॉयनिसनं 30 धावांचं योगदान दिलं.
202 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या इंग्लिश संघाला सलामीवीर फिलिप सॉल्ट (37) आणि जोस बटलर (42) यांनी तुफानी सुरुवात करून दिली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 73 धावांची भागीदारी झाली. मात्र पॉवरप्लेनंतर लेगस्पिनर ॲडम झम्पा आक्रमणावर येताच त्यानं या दोन्ही फलंदाजांना बाद करत इंग्लंडला बॅकफूटवर आणलं. सॉल्ट 8व्या षटकात बाद झाला तर बटलरनं 10व्या षटकात त्याची विकेट गमावली.
हे दोन्ही फलंदाज बाद झाल्यानंतर इंग्लंडची गाडी रुळावरून घसरली आणि त्यानंतर त्यांच्या एकाही फलंदाजाला संघाला सांभाळता आलं नाही. झम्पानं 4 षटकात 28 धावा देत या दोघांचे बळी घेतले. या उत्कृष्ट गोलंदाजीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या –
डेव्हिड मिलरनं दक्षिण आफ्रिकेची लाज राखली, नेदरलँड्सविरुद्ध पुन्हा एकदा होणार होता मोठा अपसेट
टी20 विश्वचषकात आणखी एक अपसेट! अफगाणिस्ताननं केला न्यूझीलंडचा एकतर्फी पराभव
विश्वचषकातील सर्वात मोठ्या लढतीत भारत-पाकिस्तान आमनेसामने! कोणता संघ ठरेल वरचढ? संपूर्ण स्क्वॉड Analysis