टी20 विश्वचषक सुरू होऊन दोन आठवडेही उलटले नसून आताच अनेक मोठ्या संघांवर स्पर्धेतून बाहेर पडण्याचा धोका आहे. यातील एक नाव म्हणजे भारताचा शेजारील देश पाकिस्तान! एडन मार्करमच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिकेनं 3 पैकी 3 सामने जिंकून सुपर 8 मधील स्थान निश्चित केलं आहे. तर 3 मोठ्या संघांना स्पर्धेतून बाद होण्याचा धोका आहे. चला तर मग, हे तीन संघ कोणते हे या बातमीद्वारे जाणून घेऊया.
(1) पाकिस्तान
2024 च्या टी20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्ताननं आतापर्यंतचे दोन्ही सामने गमावले आहेत. बाबर आझमच्या संघानं प्रथम अमेरिकेकडून आणि नंतर भारताकडून पराभवाची चव चाखली. पाकिस्तानचे सध्या 2 सामन्यांत 0 गुण आहेत. त्यांना सुपर-8 मध्ये जायचं असेल तर पुढील दोन्ही सामने मोठ्या फरकानं जिंकावे लागतील. मात्र असं केलं तर त्यांचं पुढील फेरीतील स्थान निश्चित नाही. कारण त्यांना कॅनडा आणि अमेरिका पुढील सर्व सामने हरतील अशी आशा बाळगावी लागेल. पाकिस्तान आणि अमेरिका या दोघांचेही प्रत्येकी चार गुण होऊ शकतात आणि अशा स्थितीत नेट रनरेटच्या आधारे निर्णय घेतला जाईल. अमेरिकेचा कोणताही सामना पावसानं वाहून गेला तर पाकिस्तान वर्ल्ड कपमधून बाहेर पडेल.
(2) इंग्लंड
‘ब’ गटात गतविजेता इंग्लंडचा संघ अडचणीत असल्याचा दिसतोय. इंग्लंडचा स्कॉटलंडसोबतचा पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. तर दुसऱ्या सामन्यात जोस बटलरच्या सेनेला ऑस्ट्रेलियाकडून 36 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. आता इंग्लंडचे 2 सामन्यांत 1 गुण असून त्यांचा नेट रनरेट -1.800 आहे. इंग्लंडला पुढील 2 सामने ओमान आणि नामिबियाविरुद्ध मोठ्या फरकानं जिंकावे लागतील. याशिवाय स्कॉटलंडचा ऑस्ट्रेलियाकडून मोठ्या फरकानं पराभव व्हावा अशी प्रार्थना करावी लागेल. सध्या इंग्लंडची परिस्थिती अत्यंत कठीण दिसत आहे.
(3) न्यूझीलंड
न्यूझीलंड ‘क’ गटात असून स्पर्धेतील त्यांच्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्ताननं त्यांचा 84 धावांच्या मोठ्या फरकानं पराभव केला होता. किवी संघाचे अजून 3 सामने बाकी असले तरी त्यांचा नेट रनरेट -4.200 आहे. वेस्ट इंडिज आणि अफगाणिस्ताननं आतापर्यंत आपले दोन्ही सामने जिंकले असून ते ‘क’ गटात टॉप-2 मध्ये आहेत. न्यूझीलंडला सुपर-8 मध्ये जायचं असेल तर उर्वरित सर्व सामने जिंकावे लागतील. तसेच यजमान वेस्ट इंडिज पुढचे दोन सामने हरेल, अशी आशा किवी संघाला करावी लागेल. अफगाणिस्तान, वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड हे तिन्ही संघ 4 गुणांच्या चक्रात अडकू शकतात. अशा परिस्थितीत सुपर-8 चा निर्णय नेट रन-रेटच्या आधारे होईल.
महत्त्वाच्या बातम्या –
टी20 विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेनं केला अद्भूत पराक्रम, टीम इंडियाचा विक्रम मोडून रचला इतिहास
3 खेळाडू ज्यांना शिवम दुबेच्या जागी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते
बांग्लादेशच्या खेळाडूचे पंचांवर गंभीर आरोप, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर सुरू झाला नवा वाद