यंदाच्या टी20 विश्वचषकात (T20 World Cup) भारतीय संघानं (Team India) 3 सामन्यात विजय मिळवत चमकदार कामगिरी केली. परंतु भारतीय संघाचा दिग्गज खेळाडू विराट कोहलीनं (Virat Kohli) भारताला आणि त्याच्या सर्व फॅन्सला नाराज केलं. कोहलीचा फाॅर्म भारतासाठी पुन्हा चिंतेचा विषय बनला आहे. कोहलीनं 3 सामन्यात केवळ 5 धावा केल्या आहेत. आयपीएल 2024 च्या हंगामात आरसीबीकडून खेळताना त्यानं 741 धावांसहित ऑरेंज कॅप मिळवली होती. परंतु टी20 विश्वचषकापर्यंत त्याचा फाॅर्म टिकून राहिला नाही.
भारताचे 3 सामने नासाउ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळले गेले. नासाउच्या या खेळपट्टीवर अनेक फलंदाज संघर्ष करताना दिसले. तर अनेक माजी दिग्गज खेळाडूंनी या खेळपट्टीवर प्रश्न उपस्थित केले. परंतु भारताला अनेक कठीण परिस्थितीत सामने जिंकवून देणारा कोहली मात्र या खेळपट्टीवर शांत राहिला. अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात कोहली नेत्रावळकरच्या चेंडूवर शून्यावर बाद झाला. यामुळे त्याच्या नावावर लज्जास्पद विक्रमाची नोंद झाली. टी20 विश्वचषकाच्या इतिहासात कोहली प्रथमच शून्यावर बाद झाला.
शेवटच्या टी20 विश्वचषकात पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात कोहलीनं भारताला अविश्वसनीय खेळी खेळून सामना जिंकवून दिला होता. परंतुु यंदाच्या टी20 विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध तो 4 धावांवर तंबूत परतला. तर आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात तो केवळ एकच धाव करु शकला. अमेरिकेविरुद्ध शून्यावर बाद झाल्यानंतर कोहलीची आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यातील फलंदाजी सरासरी 50 पेक्षा कमी झाली आहे.
यंदाच्या टी20 विश्वचषकापूर्वी विराट कोहलीची आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यातील सरासरी 51.75 होती. परंतु आता या सरासरीत घसरण होऊन 50 पेक्षा कमी झाली आहे. कोहलीनं सप्टेंबर 2019 मध्ये दक्षिण आफ्रिकाविरुद्ध मोहालीमध्ये नाबाद 72 धावांची खेळी करुन टी20 मध्ये 50+ सरासरीचं आव्हान पूर्ण केलं होतं. यासोबतच तो कसोटी, एकदिवसीय, टी20 सामन्यात 50+ सरासरीनं धावा करणारा जगातील नंबर एक फलंदाज बनला होता.
परंतु आता यंदाच्या टी20 विश्वचषकात पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवान आणि विराट कोहली यांच्यामध्ये फलंदाजीच्या सरासरीमध्ये चुरस राहणार आहे. आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात कोहलीची फलंदाजी सरासरी (49.90) आहे. तर मोहम्मद रिझवानची (Mohammed Rizwan) टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यातील फलंदाजी सरासरी (49.19) आहे. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात कोहलीची फलंदाजी सरासरी 58.67 आहे. तर कसोटीमध्ये त्याची फलंदाजी सरासरी 49.15 आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
अशी आहेत पाकिस्तानसाठी ‘क्वालिफाय’ समीकरणे, पाहा कोणत्या संघाचा होणार पत्ता कट
कॅनडाविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारतीय संघाचे सरावसत्र रद्द! जाणून घ्या कारण
कोण वीरेंद्र सेहवाग…? शाकिब अल हसनचे वादग्रस्त वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल






