पाकिस्तानने टी-20 वर्ल्ड कप 2026 (ICC T20 international world cup 2026) मध्ये भारतासोबत खेळण्यास शेवटच्या क्षणी नकार दिला आहे. रविवारी (1 फेब्रुवारी) पाकिस्तान सरकारने ‘X’ (ट्विटर) वर एका पोस्टद्वारे माहिती दिली की, त्यांची टीम वर्ल्ड कपमध्ये खेळेल, पण 15 फेब्रुवारीला श्रीलंकेत भारताविरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी मैदानात उतरणार नाही. पाकिस्तानच्या या निर्णयामुळे क्रिकेट जगताचे अंदाजे 4,500 कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकते.
कोणत्याही वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान सामना हा सर्वाधिक पाहिला जाणारा आणि सर्वाधिक कमाई करून देणारा सामना असतो. भारत-पाकिस्तान (IND vs PAK) सामन्याचे अंदाजे मूल्य 500 दशलक्ष अमेरिकन डॉलर (सुमारे 4,500 कोटी रुपये) आहे. यात ब्रॉडकास्टिंग (प्रसारण), जाहिराती, स्पॉन्सरशिप आणि तिकीट विक्री यांचा समावेश होतो. इतर कोणताही सामना याच्या आसपासही टिकत नाही.
केवळ जाहिरातींतून या सामन्यात 300 कोटींची कमाई अपेक्षित होती. या सामन्यात जाहिरातीच्या केवळ 10 सेकंदांच्या स्लॉटची किंमत 25 ते 40 लाख रुपये इतकी होती, जी संपूर्ण स्पर्धेत सर्वाधिक आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा सामना न खेळल्यामुळे दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डांना प्रत्येकी 200 कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागू शकते. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (PCB) आयसीसीकडून महसुलाचा 5.75% हिस्सा मिळतो, जो साधारण 316 कोटी रुपये होतो. सामना रद्द झाल्यास या महसुलावरही पाणी सोडावे लागण्याची भीती आहे. भारत-पाक सामना जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला, तरी स्टेडियम हाऊसफुल्ल असते. या सामन्याची तिकिटे महाग असूनही मोठ्या प्रमाणात विकली जातात. आता सामना रद्द झाल्यास, आयोजकांना तिकिटांचे पैसे रिफंड करावे लागतील, ज्यामुळे मोठे नुकसान होईल.






