आयसीसी टी-20 वर्ल्ड कप 2026 चा सर्वात मोठा सामना कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जात आहे. पाकिस्तानने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु टीम इंडियाच्या फलंदाजांनी त्यांचा हा निर्णय चुुकीचा ठरवला.
सलामीवीर अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) स्वस्तात बाद झाल्यानंतर इशान किशनने (Ishaan kishan) पाकिस्तानी गोलंदाजांची कंबर मोडली. इशानने अवघ्या 40 चेंडूत 77 धावांची खेळी केली, ज्यात 10 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. त्याने पॉवरप्लेमध्येच 42 धावा केल्या, जो भारत-पाक टी-20 सामन्यांतील एक नवीन विक्रम आहे.
इशानने 27 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. भारत-पाक वर्ल्ड कप इतिहासातील हे सर्वात वेगवान अर्धशतक ठरले आहे. तो आता विराट कोहली आणि मोहम्मद रिझवान यांच्यासह भारत-पाक सामन्यांत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सामील झाला आहे.
नाणेफेकीच्या (Toss) वेळी मैदानावर कमालीचा तणाव पाहायला मिळाला. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने पाकिस्तानी कर्णधार सलमान अली आगा याच्याशी हस्तांदोलन करण्यास स्पष्ट नकार दिला. ऑपरेशन सिंदूरनंतर भारताने पाकिस्तानसोबत हस्तांदोलन न करण्याची जी भूमिका घेतली आहे, ती या सामन्यातही कायम राहिली.
यावर माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. हस्तांदोलन न करणे हा मूर्खपणा आहे, खिलाडूवृत्ती दाखवा नाहीतर खेळूच नका,” असे त्यांनी सुनावले आहे. तर युवा फलंदाज अभिषेक शर्मासाठी हा वर्ल्ड कप आतापर्यंत अत्यंत खराब ठरला आहे. युएसएनंतर आता पाकिस्तानविरुद्धही अभिषेक खाते न खोलता बाद झाला. टी-20 वर्ल्ड कपच्या पहिल्या दोन सामन्यात शून्यावर बाद होणारा तो आशिष नेहरानंतरचा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे.
भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात खराब झाली. हार्दिक पांड्याने आपल्या पहिल्याच षटकात पाकिस्तानच्या फरहानला शून्यावर बाद करून मोठा धक्का दिला. तर, जसप्रीत बुमराहने सैम अयुबला 6 धावांवर बाद करून पाकिस्तानला बॅकफूटवर ढकलले आहे.






