आगामी टी२० विश्वचषक २०२६साठी पाकिस्तानने त्यांचा संघ जाहीर केला आहे. या स्पर्धेचे यजमानपद भारताबरोबर श्रीलंकेकडेही आहे. यामध्ये पाकिस्तानचे नेतृत्व सलमान आगा करणार आहे. पाकिस्तानने रविवारी (२५ जानेवारी) विश्वचषकासाठी त्यांच्या १५ सदस्य असलेला संघ जाहीर केला आहे. यामध्ये अनुभवी फलंदाज बाबर आझम संघात परतला असून मुख्य वेगवान गोलंदाजाला बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
हॅरिस रऊफ याची टी२० विश्वचषकासाठी संघात निवड झालेली नाही. यामुळे वेगवान गोलंदाजीचा भार शाहीन शाह आफ्रिदी आणि नसीम शाह यांच्यावर असणार आहे. संघात अष्टपैलू खेळाडूंचा भरणा आहे. फहीम अश्रफ, शाबाद खान आणि मोहम्मद नवाज यांच्यामुळे पाकिस्तानकडे फलंदाज-गोलंदाजीसाठी अधिक उपलब्ध पर्याय आहेत. रऊफ बरोबर वरिष्ठ विकेटकीपर-फलंदाज मोहमद रिजवान, हसन अली यांचीही विश्वचषक संघात निवड झालेली नाही.
पाकिस्तानचा संघ विश्वचषकाआधी घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी२० मालिका खेळणार आहे. यासाठी संघ आधीच जाहीर झाला असून त्यातील काहींचा समावेश विश्वचषकात आहे. त्या मालिकेत केवळ सलमान मिर्जा याचाच समावेश नाही. टी२० विश्वचषकासाठी बाबर समवेत फखर जमान, साहिबजादा फरहान, सईम आयुब आणि सलमान हे प्रमुख फलंदाज आहेत.
या विश्वचषकात पाकिस्तानचा गट अ मध्ये आहे. यामध्ये भारत, नेदरलॅंड्स, युएसए आणि नामिबियाचा समावेश आहे.
विश्वचषकात पाकिस्तानचे सर्व साखळी सामने कोलंबोमध्ये खेळले जाणार आहेत. स्पर्धेची सुरूवात पाकिस्तान विरुद्ध नेदरलॅंड्स या सामन्याने होणार आहे. हा सामना ७ फेब्रुवारीला खेळला जाणार आहे.
या स्पर्धेत पाकिस्तान दुसरा साखळी सामना १० फेब्रुवारील युएसए विरुद्ध, तिसरा सामना १५ फेब्रुवारीला भारताविरुद्ध आणि चौथा सामना १८ फेब्रुवारीला नामिबियाविरुद्ध खेळणार आहे.
टी20 वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर
सलमान आगा (कर्णधार), फखर जमान, उस्मान खान, शाहीन आफ्रिदी, साहिबजादा फरहान (विकेटकीपर), ख्वाजा नफय (विकेटकीपर), नसीम शाह, सईम आयुब, शादाब खान, सलमान मिर्जा, बाबर आझम, मोहमद नवाज, उस्मान तारिक, फहीम अश्रफ, अबरार अहमद.






