---Advertisement---

‘नका येऊ रे, तुमची वाट लागेल’! भारताच्या विश्वविजेत्या खेळाडूचा पाकिस्तानला सल्ला

On: बुधवार, जानेवारी 28, 2026 5:13 PM
---Advertisement---

आगामी पुरूष टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धेची सुरूवात ७ फेब्रुवारीपासून होत आहे. या स्पर्धेतून बांग्लादेश बाहेर पडला असून पाकिस्ताननेही बाहेर पडण्याची धमकी दिली आहे. याबाबत पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे (पीसीबी) अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी ते या स्पर्धेत खेळणार की नाही हे विचार करून सांगू, असे वक्तव्य केले होते. त्याला भारतीय दिग्गजाने चांगलेच उत्तर दिले आहे.

बांग्लादेशने सुरक्षेच्या कारणामुळे भारतात टी२० विश्वचषक खेळण्यास मनाई केली होती. आयसीसीच्या हस्तक्षेपामुळेही त्यांनी त्यांचा निर्णय बदलला नाही. यानंतर पाकिस्तानही या स्पर्धेत खेळणार की नाही हे ठरवू अशा प्रकारचे विधान करत नक्वींनी गोंधळ निर्माण केला आहे. यावरून भारताचा माजी सलामीवीर आणि १९८३चा विश्वविजेते के श्रीकांत यांनी मजा घेतली आहे. त्यांनी नक्वीच्या विधानानंतर “पाकिस्तानने या स्पर्धेपासून दूर राहावे यातच त्यांचा फायदा आहे”,असे म्हटले आहे.

नक्वी यांनी संघाच्या स्पर्धेतील प्रवेशाबाबत पाकिस्तानच्या पंतप्रधानांची भेट घेतली होती. त्यामध्ये त्यांनी चर्चा केल्यानंतर येत्या शुक्रवारी किंवा सोमवारी यावर निर्णय घेऊ असे ठरविले. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान एकाच गटात आहे. “सध्याचा भारताचा फॉर्म पाहता आणि सामने घरच्या मैदानावर असल्याने भारत पाकिस्तानवर भारी पडण्याची दाट शक्यता आहे”, असेही श्रीकांत त्यांच्या युट्यूबच्या चॅनलवर म्हणाले आहेत.

भारताच्या न्यूझीलंडविरुद्धच्या कामगिरीचा उल्लेख करत श्रीकांत म्हणाले, “भारताने शेवटच्या सामन्यात १५ षटकात २०९ धावा केल्या होत्या. या सामन्यात १० षटकात १५० धावा. त्यांचा हा फॉर्म पाहून नक्कीच काही संघ म्हणत असतील ‘आम्ही नाही येत, चषक तुम्हीच ठेवा.”

“पाकिस्तान, तुम्ही पण येऊ नका. तुमचा तो नक्वी म्हणतोय की आम्ही स्पर्धेत येण्याबाबत विचार करू-नका येऊ. तुम्ही खूप वाईट हराल. कोलंबोमध्ये मारलेला षटकार मद्रासमध्ये येऊन पडेल. म्हणून तुमच्याकडे एकच चांगला पर्याय आहे तो म्हणजे या स्पर्धेपासून लांब राहा. काहीतरी कारणे शोधा आणि येऊच नका. भारताचा सध्याचा फॉर्म पाहता विरोधी संघासाठी मोठे आव्हान आहे,” असेही श्रीकांत यांनी पुढे म्हटले.

नक्वी यांच्या विधानानंतर काही वेळातच पाकिस्तानने त्यांचा विश्वचषकासाठीचा संघ जाहीर केला. या स्पर्धेत त्यांचा पहिला सामना ७ फेब्रुवारीला नेदरलॅंड्स विरुद्ध कोलंबोमध्ये खेळला जाणार आहे. या स्पर्धेसाठी पाकिस्तानने बाबर आझमला संघात घेतले असून सलमान आगा कर्णधार असणार आहे. त्याचबरोबर वेगवान गोलंदाज हॅरिस रौफला त्यांनी संघातून वगळले आहे. त्याने नुकत्याच पार पडलेल्या बिग बॅश लीगमध्ये सर्वाधिक विकेट्स घेतल्या होत्या.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---