बांगलादेश क्रिकेट बोर्डाला (BCB) आता 2026 च्या टी-20 वर्ल्ड कपमधील आपले सामने भारतात खेळण्याची इच्छा नाही. मुस्तफिजुर रहमानला (Mustafijur Rehman) आयपीएल 2026 मधून बाहेर केल्यामुळे बांगलादेश बोर्ड नाराज आहे. त्यांनी आपले सामने श्रीलंकेत हलवण्याची मागणी आयसीसीकडे (ICC) केली होती, मात्र आता या प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे.
मुस्तफिजुर रहमानला आयपीएलमधून बाहेर केल्यामुळे बांगलादेश बोर्ड संतापले आहे. बीसीसीआयवरील याच नाराजीमुळे त्यांनी भारतात न खेळण्याचा पवित्रा घेतला होता. ही परिस्थिती हाताळण्यासाठी आयसीसीने बीसीसीआय आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डासोबत महत्त्वाची बैठक घेतली.
‘द टेलिग्राफ’च्या रिपोर्टनुसार, आयसीसीने बांगलादेश बोर्डाला आपल्या निर्णयावर पुन्हा विचार करण्यास सांगितले आहे. ऐनवेळी वेळापत्रकात मोठा बदल करणे आयसीसीला मान्य नाही. बांगलादेश बोर्डाने स्पष्ट केले आहे की, ते या विषयावर आपल्या सरकारशी चर्चा करतील आणि सरकार जो निर्णय घेईल, तोच अंतिम असेल.
आयसीसीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही बांगलादेशला भारतात खेळण्यासाठी मनवण्याचा प्रयत्न करत आहोत. यात फक्त दोन संघ नाहीत, तर चाहते आणि ब्रॉडकास्टर्सचाही प्रश्न आहे. सर्व बोर्डांना माहित आहे की, भारतासोबत खेळल्यानेच फायदा होतो, त्यामुळे बीसीसीआयशी चांगले संबंध ठेवणे सर्वांच्या हिताचे आहे. तरीही, खबरदारी म्हणून आयसीसीने ‘प्लॅन बी’ (पर्यायी व्यवस्था) वर काम करण्यास सुरुवात केली आहे.
बांगलादेश सध्या रागात असला तरी, आर्थिक फायदा आणि आयसीसीचा दबाव पाहता त्यांचे सामने भारतातच होण्याची शक्यता जास्त आहे.






