---Advertisement---

सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाला नमवल्यानंतर रोहितचे मोठे विधान, सूर्यकुमार अन् शमीचं गायलं गुणगान

Rohit-Sharma
---Advertisement---

भारतीय संघाने सोमवारी (दि. 17 ऑक्टोबर) ब्रिस्बेन येथे पार पडलेल्या सराव सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाला 6 धावांनी पराभूत केले. या विजयात मोहम्मद शमी, केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव यांनी मोलाचा वाटा उचलला. यावेळी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंच याने भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यात तो अपयशी ठरला. सामन्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा संघाच्या फलंदाजी आणि गोलंदाजीवर भलताच खुश असल्याचे दिसला.

काय म्हणाला रोहित?
रोहित शर्मा (Rohit Sharma) म्हणाला की, “आम्ही चांगली फलंदाजी केली. शेवटी आम्ही 10-15 धावा आणखी जोडू शकलो असतो. आम्हाला शेवटच्या षटकापर्यंत टिकून खेळायचे होते, जे सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने करून दाखवले. ही एक चांगली खेळपट्टी होती, जिथे तुम्ही उसळीवर विश्वास ठेवू शकता. तसेच, आमच्या फलंदाजांनी त्याच पद्धतीने फलंदाजी केली. मोठ्या सीमारेषेसोबत खेळताना तुम्हाला हुशारीने खेळावे लागेल. चौकार- षटकार मारणे खूप महत्त्वाचे आहे. मात्र, एका षटकात 8-9 धावा करण्यासाठी एकेरी आणि दुहेरी धाव घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे.”

“आम्ही पर्थनंतर यावर जास्त लक्ष दिले. आम्हाला शेवटच्या षटकांमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. आम्हाला चेंडूची लेंथ आणि रणनीती बदलण्याची गरज आहे. कधीकधी अपयशी होण्याचाही पर्याय असतो. एकूणच काय तर हा चांगला सामना होता. ही खेळपट्टीही चांगली होती आणि फलंदाजांनी आमच्यावर दबाव टाकला. अखेरच्या षटकात मोहम्मद शमी (Mohammed Shami) याला गोलंदाजी टाकण्यास सांगणे आमची योजना होती आणि तुम्हीही पाहिले की, त्याने ते उत्तमरीत्या करून दाखवले,” असेही पुढे बोलताना रोहित म्हणाला.

सामन्याचा आढावा
भारतीय संघाने या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना 186 धावा चोपल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघाचा डाव 180 धावांवरच संपुष्टात आला. त्यामुळे भारताने हा सामना 6 धावांनी खिशात घातला. यावेळी ऑस्ट्रेलियाची सलामी जोडी मिशेल मार्श (Mitchell Marsh) आणि कर्णधार ऍरॉन फिंच (Aaron Finch) यांनी संघाला चांगली सुरुवात करून देत 41 धावांची भागीदारी रचली. मार्श 35 धावांवर बाद झाला. त्यानंतर फिंचने 54 चेंडूत 3 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने 76 धावा चोपल्या. यावेळी भारताकडून गोलंदाजी करताना मोहम्मद शमी याने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने 3 विकेट्स घेतल्या. तसेच, एका फलंदाजाला त्याने धावबाद केले.

तत्पूर्वी भारताकडून फलंदाजी करताना केएल राहुल (33 चेंडूत 57 धावा) आणि सूर्यकुमार यादव (33 चेंडूत 50 धावा) यांच्या अर्धशतकाच्या मदतीने भारताने 186 धावांचा डोंगर उभा केला. आता या टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेत भारताचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध 23 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारताचा सामना करण्यापूर्वीच पाकिस्तानच्या येतात नाकी नऊ? कर्णधार बाबर म्हणाला, ‘रोहितला…’
अर्रर्र, आता कसं होणार! कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध भिडण्यापूर्वीच रिषभ पंत जखमी? फोटो व्हायरल

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---