भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळत आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात संघाचा युवा वेगवान गोलंदाज दीपक चाहर खेळला नाही. आता तो या सामन्यात कशामुळे खेळला नाही, या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे. संघातील काही प्रमुख खेळाडू आधीच दुखापतीच्या कारणास्तव विश्रांतीवर आहेत आणि टी-20 विश्वचषकात देखील खेळणार नाहीत. अशातच आता दीपक चाहरला देखील दुखापत झाल्याचे समोर येत आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिला सामना गुरुवारी (6 ऑक्टोबर) लखनऊमध्ये खेळला गेला. भारतीय संघाने या सामन्यात 9 धावांनी पराभव स्वीकारला. दीपक चाहर (Deepak Chahar) जर या सामन्यात खेळला असता, तर संघाला नक्कीच फायदा मिळू शकत होता. संघाच्या निवड प्रक्रियेशी संबंधित एका विश्वसनीय सूत्राने याविषयी माहिती दिली की, सराव सत्रात घोट्याला दुखापत झाल्यामुळे तो या सामन्यात खेळू शकला नाही.
पीटीआयसोबत या सूत्राच्या हवाल्याने माहिती दिली आहे की, “दीपक चाहरचा घोटा मुडपला आहे, पण ही दुखापत जास्त गंभीर नाहीये. असे असले तरी, त्याला काही दिवसांची विश्रांती सांगितली जाऊ शकते. अशात त्याला खेळवायचे की नाही, ही संघ व्यवस्थापनाचा निर्णय असेल. कारण तो टी-20 विश्वचषकात राखीव खेळाडूंमध्ये सहभागी आहे. पण जर तिथे त्याची गरज असेलच, तर त्याला प्राथमिकता मिळेल.”
भारतीय संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह देखील दुखापतीच्या कारणास्तव आगामी टी-20 विश्वचषक खेळू शकणार नाहीये. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार बुरमहाच्या जागी मोहम्मद शमी टी-20 विश्वचषक खेळेल, अशी पूर्ण शक्यता आहे. “मोहम्मद शमी जर फिट असेल, तर संघात खेळण्यासाठी त्याला प्राथमिकता असेल. तो पुढच्या आठवड्यात संघासोबत सहभागी होऊ शकतो,” असेही सांगितले गेले. दरम्यान, आगामी टी-20 विश्वचषक येत्या 16 ऑक्टोबरला सुरू होईल. भारताला पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत 23 ऑक्टोबर रोजी खेळायचा आहे. बुमराहव्यतिरिक्त रविंद्र जडेजा देखील दुखापतीच्या कारणास्तव विश्वचषकात खेळणार नाहीये. जडेजाच्या जागी अक्षर पटेलला संधी दिली जाईल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
दिप्तीच्या मंकडींग प्रकरणावर न्यूझीलंड क्रिकेटरची प्रतिक्रिया; म्हणतेय, ‘ते नियमात, पण मी अजिबात…’
‘तुम्ही म्हणाला तर उलटा लटकून…’, नेटकऱ्याला पाकिस्तानी अष्टपैलूकडून चोख प्रत्युत्तर