मागील दोन वर्षापासून लांबत चाललेल्या पुरुष टी२० विश्वचषकाच्या आयोजनस्थळाबाबत आता अंतिम निर्णय झाला आहे. टी२० विश्वचषकाचे आयोजन इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) उर्वरित हंगामानंतर दोन दिवसांनी संयुक्त अरब अमीराती (युएई) येथेच करण्याचे ठरवण्यात आले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी ही माहिती दिली.
युएईमध्ये होणार विश्वचषक
भारतात आयोजित होणारा टी२० विश्वचषक आता युएई येथे खेळविण्यात येणार असल्याची नेमकी बातमी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी एका प्रसिद्धी वृत्तवाहिनीला दिली. गांगुली म्हणाले, “टी२० विश्वचषक २०२१ आता भारताऐवजी युएई येथे होईल. भारतात दर दिवशी कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत खेळाडूंच्या आरोग्याचा विचार करून ही स्पर्धा देशाबाहेर खेळणे उचित ठरणार आहे.”
मागील महिन्यातच गांगुली यांच्यासह बीसीसीआय सचिव जय शहा आणि बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला हे विश्वचषकाच्या आयोजनाबाबत चर्चा करण्यासाठी युएई येथे गेले होते.
आयपीएलनंतर होईल विश्वचषक
दोन दिवसांपासून येत असलेल्या बातम्यांनुसार, आयपीएल २०२१ चा उर्वरित हंगाम १९ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत युएई येथील दुबई, शारजा व अबुधाबी या शहरातील मैदानावर खेळविण्यात येईल. त्यानंतर दोनच दिवसांनी म्हणजे १७ ऑक्टोबर पासून विश्वचषक सुरू होईल. मुख्य स्पर्धेसाठी आवश्यक असणारे ८ संघाच्या पात्रता फेरीतील सामने ओमान येथे तर मुख्य स्पर्धा युएईमध्ये खेळविण्याचे नियोजन आहे.
लांबत चालले होते विश्वचषकाचे नियोजन
सातव्या पुरुष टी२० विश्वचषकाचे आयोजन नियोजित कार्यक्रमानुसार ऑक्टोबर २०२० मध्ये ऑस्ट्रेलियात करण्यात येणार होते. मात्र, कोरोनाचा प्रभाव वाढल्याने ही स्पर्धा रद्द करून २०२१ मध्ये भारतात घेण्याचे ठरले. परंतु, आता भारतात देखील अशीच परिस्थिती असल्याने स्पर्धा नाईलाजाने युएईत खेळली जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
अर्धशतकानंतर ‘अशाप्रकारे’ मिताली राजला बाद होताना पाहून क्रिकेटप्रेमीही आश्चर्यचकित, व्हिडिओ व्हायरल
“जर देव प्रतिसाद देत नसेल तर…” पृथ्वी शॉने कसून सराव करतानाचा व्हिडिओ शेअर करत दिले हटके कॅप्शन