आयसीसी पुरुष टी20 वर्ल्ड कपचा 10वा हंगाम 7 फेब्रुवारीपासून भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली सुरू होत आहे. या स्पर्धेत यंदाही अनेक नवे विक्रम प्रस्थापित होण्याची शक्यता आहे. मात्र, टी20 वर्ल्ड कपच्या इतिहासात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम आजही एका नावावर ठाम आहे आणि ते नाव म्हणजे वेस्ट इंडिजचा स्फोटक सलामीवीर ख्रिस गेल. जागतिक क्रिकेटमध्ये ‘युनिव्हर्स बॉस’ म्हणून ओळखला जाणारा गेल हा टी20 वर्ल्ड कपमधील षटकारांचा बादशहा ठरला आहे.
गेलने 2007 ते 2021 या कालावधीत टी20 वर्ल्ड कपमध्ये एकूण 33 सामने खेळले. या स्पर्धेत त्याने 31 डावांमध्ये फलंदाजी करत तब्बल 63 षटकार लगावले. टी20 वर्ल्ड कपच्या इतिहासात आजवर कोणत्याही फलंदाजाला हा आकडा गाठता आलेला नाही. गेलच्या स्फोटक फलंदाजीमुळे वेस्ट इंडिजने दोनदा (2012 आणि 2016) टी20 वर्ल्ड कपचे विजेतेपद पटकावले होते.
या यादीत दुसऱ्या क्रमांकावर भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा आहे. रोहितने 47 टी20 वर्ल्ड कप सामन्यांच्या 44 डावांमध्ये 50 षटकार मारले आहेत. इंग्लंडचा जॉस बटलर 43 षटकारांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे, तर ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर 40 षटकारांसह चौथ्या स्थानावर आहे. भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली 35 षटकारांसह या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे.
मात्र, गेलचा हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. आज कोट्यवधींची संपत्ती, आलिशान बंगले आणि महागड्या गाड्यांचा मालक असलेला गेल कधीकाळी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जगत होता. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या गेलची नेटवर्थ सुमारे 375 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. पण एक असा काळ होता, जेव्हा त्याच्याकडे राहण्यासाठी पक्के घरही नव्हते. तो झोपडीत राहत होता आणि पोट भरण्यासाठी कचरा उचलण्याचे काम करत होता. त्याची आई जमैकाच्या रस्त्यांवर चिप्स विकून घर चालवत होती.
क्रिकेटमध्ये पाऊल ठेवल्यानंतर मात्र गेलचे आयुष्य पूर्णपणे बदलले. आपल्या ताकदीच्या फटक्यांनी आणि निर्भीड शैलीने त्याने जागतिक क्रिकेटमध्ये वेगळी ओळख निर्माण केली. आजही टी20 वर्ल्ड कपचा विचार झाला की सर्वाधिक षटकारांचा ‘युनिव्हर्स बॉस’ म्हणून गेलचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते.






