आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ च्या पात्रता फेरी सामन्यांचा टप्पा पार पडला असून ४ संघांनी सुपर १२ फेरीत प्रवेश केला आहे. यासह सुपर १२ फेरीचे चित्र स्पष्ट झाले असून शनिवारपासून (२३ ऑक्टोबर) या टप्प्याची सुरुवात होणार आहे. यातील दुसरी लढत २ वेळच्या विजेत्या वेस्ट इंडिज विरुद्ध १ वेळच्या विजेत्या इंग्लंड यांच्यात होणार आहे.
या सामन्यातून वेस्ट इंडिजचा संघ त्यांची लय पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्नशील असेल. तर मागील २०१६ च्या टी२० विश्वचषक अंतिम सामन्यातील पराभवाचा वचपा काढण्यासाठी इंग्लंडचा संघ आपले सर्वोत्कृष्ट देताना दिसेल. या सामन्यात वेस्ट इंडिजच्या कार्लोस ब्रेथवेटने अंतिम षटकात सलग ४ चेंडूंवर ४ षटकार ठोकत इंग्लंडचे विजेते बनण्याचे स्वप्न धुळीस मिळवले होते.
वेस्ट इंडिज संघ चांगल्या लयीच्या शोधात
उभय संघातील आमने सामने कामगिरी पाहायची झाल्यास, आतापर्यंत इंग्लंड आणि वेस्ट इंडिजमध्ये १८ टी२० सामने झाले आहेत. त्यापैकी ११ सामन्यात वेस्ट इंडिजने बाजी मारली आहे. तर केवळ ७ सामने जिंकण्यात इंग्लंडचा संघ यशस्वी झाला आहे. परंतु टी२० विश्वचषकाचे सामने होण्यापूर्वी झालेल्या सराव सामन्यात मात्र वेस्ट इंडिजची गाडी डगमगताना दिसली आहे. वेस्ट इंडिजने पाकिस्तान आणि अफगानिस्तानविरुद्धच्या सराव सामन्यात पराभवाचे तोंड पाहिले आहे.
वेस्ट इंडिजच्या निराशाजनक कामगिरीमागचे मुख्य कारण म्हणजे, ‘युनिव्हर्स बॉस’ ख्रिस गेलचा खराब फॉर्म होय. आयपीएल २०२१ च्या युएई टप्प्यात त्याची बॅट शांत राहिली होती. टी२० विश्वचषकाच्या सराव सामन्यातही हेच चित्र पाहायला मिळाले. गेलबरोबरच इविन लुईस, लेंडल सिमन्स, शिमरॉन हेटमायर आणि निकोलस पूरन या खेळाडूंच्या प्रदर्शनावरही सर्वांचे लक्ष असेल.
इंग्लंडची संभावित प्लेइंग इलेव्हन-
जोस बटलर (यष्टीरक्षक), जेसन रॉय, डेविड मालन, जॉनी बेअरस्टो, इयॉन मॉर्गन (कर्णधार), लियाम लिविंगस्टोन, मोईन अली, डेविड विली, आदिल रशीद, मार्क वुड, ख्रिस वोक्स/ख्रिस जॉर्डन
वेस्ट इंडिजची संभावित प्लेइंग इलेव्हन-
लिंडल सिमन्स/आंद्रे फ्लेचर, इविन लुईस, ख्रिस गेल, शिमरॉन हेटमायर, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), कायरन पोलार्ड (कर्णधार), आंद्रे रसेल, रोस्टन चेस/अकेल होसेन, ड्वेन ब्रावो, ओबेड मॅककॉय, हेडन वॉल्श जूनियर
महत्त्वाच्या बातम्या-
आजपासून रंगणार सुपर १२ सामन्यांचा थरार, ‘या’ ११ खेळाडूंसह उतरतील ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका संघ
भारताच्या ‘या’ खेळाडूंकडे आहे चिक्कार पैसा, तरीही करतात सरकारी नोकरी; काही नावं ओळखीची