टी20 क्रिकेटमध्ये 2024 हे वर्ष भारतासाठी खूपच संस्मरणीय ठरलं. रोहित ब्रिगेडनं वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत खेळला गेलेला टी20 विश्वचषक जिंकून भारताचा 11 वर्षांचा आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवला. भारतानं शेवटची आयसीसी ट्रॉफी 2013 मध्ये जिंकली होती. तर 2007 साली झालेल्या पहिल्या टी20 विश्वचषकानंतर भारतानं दुसऱ्यांदा हा खिताब जिंकला आहे.
2024 मधील भारताच्या टी20 रेकॉर्डबद्दल बोलायाचं झाल्यास, यावर्षी या फॉरमॅटमध्ये भारताला कोणीच टक्कर देऊ शकलं नाही. 2024 मध्ये भारतानं 24 पैकी 22 टी20 सामने जिंकले. भारताची विजयाची टक्केवारी कोणत्याही संघापेक्षा अधिक राहिली. या बातमीद्वारे आपण यावर्षीच्या भारताच्या टी20 क्रिकेटमधील प्रवासावर एक नजर टाकूया.
अफगाणिस्तानविरुद्ध रोमांचक विजय
भारतीय संघानं या वर्षाची सुरुवात अफगाणिस्तान विरुद्ध तीन सामन्यांच्या टी20 मालिकेनं केली. या मालिकेचा शेवटचा सामना खूपच रोमांचक राहिला. या सामन्यात दोन सुपर ओव्हर खेळले गेले, ज्यात भारतीय संघानं विजय मिळवला. भारतानं ही मालिका 3-0 अशी आपल्या नावे केली.
17 वर्षांनंतर टी20 विश्वचषक जिंकला
जानेवारीनंतर भारतीय संघ टी20 क्रिकेट खेळण्यासाठी थेट जूनमध्ये टी20 विश्वचषकातच उतरला. स्पर्धेच्या साखळी सामन्यांमध्ये भारतानं कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानसह आयर्लंड आणि यजमान अमेरिकेचा पराभव केला. तर कॅनडाविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला.
यानंतर सुपर 8 मध्ये भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी झाला. या सामन्यात विजय मिळवून भारतानं 2023 विश्वचषकाच्या फायनलमधील पराभवाचा बदला घेतला. या विजयानंतर आत्मविश्वास दुणावलेल्या भारतीय संघानं अफगाणिस्तान आणि बांगलादेशलाही धूळ चारली.
सेमीफायनलमध्ये भारताचा सामना इंग्लंडशी झाला. या सामन्यात भारतीय संघानं शानदार विजयाची नोंद करत 2022 टी20 विश्वचषकात झालेल्या पराभवाचा वचपा काढला. आता फायनलची बारी होती. फायनलमध्ये टीम इंडियासमोर आव्हान होतं दक्षिण आफ्रिकेचं, जे या स्पर्धेत जोरदार फार्मात होते. त्यांनी सेमीफायनलमध्ये अफगाणिस्तानचा पराभव केला होता.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सलग तिसऱ्या आयसीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहचला होता. गेल्या दोन्ही वेळा (2023 जागतिक कसोटी चॅम्पियनशीप आणि 2023 वनडे विश्वचषक) भारताला फायनलमध्ये पराभव पत्कारावा लागला होता. मात्र यावेळेस भारतीय संघाने कोणतीही चूक केली नाही.
अंतिम सामन्यात प्रथम विराट कोहलीनं बॅटनं शानदार कामगिरी केली. यानंतर हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराहनं गोलंदाजीत कमाल दाखवत भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. अखेरच्या षटकातील सूर्यकुमार यादवच्या त्या कॅचच्या आठवणी भारतीय चाहत्यांच्या मनात आजही ताज्या आहेत.
विराट, रोहित आणि जडेजाची निवृत्ती
फायनलमधील विजयानंतर जेव्हा संपूर्ण देश आनंद साजरा करत होता, तेव्हा विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी टी20 क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली. रोहितनं भारताचा विश्वचषक विजेता कर्णधार म्हणून निरोप घेतला तर विराट कोहलीनं फायनलमध्ये सामनावीराचा पुरस्कार जिंकून कारकीर्दीचा शेवट केला. या दोघांच्या निवृत्तीनंतर दिग्गज अष्टपैलू रवींद्र जडेजाने देखील टी20 क्रिकेटला अलविदा केला.
नवा कर्णधार मिळाला
रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर सर्वांच्या नजरा भारताच्या नवा टी20 कर्णधारावर होत्या. टी20 विश्वचषकात उपकर्णधार राहिलेला हार्दिक पांड्या भारताचा पुढील कर्णधार बनेल, असं मानलं जात होतं. मात्र निवडकर्त्यांनी सूर्यकुमार यादवकडे ही जबाबदारी सोपवली. टी20 विश्वचषकानंतर नवे मुख्य प्रशिक्षक बनलेल्या गौतम गंभीरचा यामागे मोठा रोल होता.
झिम्बाब्वे, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका दौरा
विश्वचषक आटोपल्यानंतर भारतीय संघ झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर गेला. या दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या युवा खेळाडूंचा संघ पाठवण्यात आला होता, ज्याचं नेतृत्व शुबमन गिलकडे होतं. या दौऱ्यावर भारतानं यावर्षीचा पहिला पराभव पाहिला. मात्र त्यानंतर संघानं जोरदार कमबॅक करत मालिका जिंकली. यानंतर टीम इंडियानं श्रीलंकेत खेळली गेलेली तीन सामन्यांची टी20 मालिका 3-0 अशी जिंकली. भारतीय संघानं यावर्षीची शेवटची टी20 मालिका दक्षिण आफ्रिकेत खेळली. या मालिकेत संजू सॅमसननं शतकापाठोपाठ शतक ठोकून धमाल उडवून टाकली होती.
सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक विकेट
यावर्षी भारतासाठी टी20 मध्ये एकही फलंदाज 500 धावांचा आकडा गाठू शकला नाही. संजू सॅमसन 436 धावांसह भारताचा टॉप स्कोअरर राहिला. त्यानं यावर्षी एकूण 3 शतकं ठोकली. या लिस्टमध्ये सूर्यकुमार यादव 429 धावांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिला. भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांबद्दल बोलायचं झाल्यास, अर्शदीप सिंग 36 विकेटसह पहिल्या स्थानी राहिला. अर्शदीपनंतर या लिस्टमध्ये दुसऱ्या स्थानी रवी बिश्नोई आहे, ज्यानं यावर्षी 22 विकेट घेतल्या.
हेही वाचा –
“रोहित शर्माचं वजन जास्त आहे, तो मोठ्या कसोटी मालिकांसाठी फिट नाही”, माजी क्रिकेटपटूची सडकून टीका
ॲडलेडमधील फ्लॉप शोनंतर रोहित शर्मा पुन्हा बदलणार बॅटिंग ऑर्डर, केएल राहुलचं काय होणार?
गाबामध्ये पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाचा घमंड तुटणार? मॅथ्यू हेडनचा टीम इंडियाला मोलाचा सल्ला