आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ साठी १५ सदस्यीय भारतीय क्रिकेट संघाची निवड करण्यात आली आहे. टी२० विश्वचषक १७ ऑक्टोबरपासून ओमान आणि यूएईमध्ये खेळला जाईल. या स्पर्धेसाठी भारत पाच फिरकीपटूंच्या संघासह उतरणार आहे. याशिवाय भारताने सूर्यकुमार यादव, ईशान किशन आणि वरुण चक्रवर्ती सारख्या काही एक्स-फॅक्टर खेळाडूंनाही संघात समाविष्ट केले आहे. या खेळाडूंची देशांतर्गत स्पर्धेत तसेच इंडियन प्रीमियर लीगमधील कामगिरी ही या तिघांना संघात समाविष्ट करण्याचे प्रमुख कारण होते.
टी२० विश्वचषक यूएईमध्ये होणार आहे आणि आयपीएल १४ चा दुसरा टप्पा देखील येथेच खेळला जात आहे. अशा परिस्थितीत खेळाडूंची तयारी अधिक जोमाने होईल.
आयसीसी टी२० विश्वचषकासाठी निवडलेले बरेच खेळाडू आयपीएलचा दुसरा टप्पा खेळत आहेत. अशा परिस्थितीत खेळाडू अधिक सामने खेळून टी२० विश्वचषकासाठी सज्ज होत आहेत, परंतु याची दुसरी बाजू अशी आहे की निवडलेल्या काही खेळाडूंनी आयपीएलमध्ये खराब फॉर्म दाखवत आहे, जे चिंतेचे कारण आहे.
बीसीसीआयला टी२० विश्वचषक संघात १० ऑक्टोबरपर्यंत बदल करण्याची वेळ आहे. पण, निवडकर्ते अद्याप मूळ निवडलेल्या संघाला पाठिंबा देत आहेत आणि त्यांना विश्वास आहे की, फॉर्मबाहेरील खेळाडू लवकरच फॉर्ममध्ये परत येतील. सध्या विश्वचषकापूर्वी ही पाच कारणे भारतीय संघासाठी चिंतेचे कारणे बनली आहेत.
१. हार्दिक पंड्याचे गोलंदाजी न करणे
सर्वात मोठा आणि कदाचित सर्वात महत्वाची बाब म्हणजे हार्दिक पंड्याची गोलंदाजी न करणे. संघाची घोषणा करताना बीसीसीआयच्या निवड समितीने स्पष्ट केले होते की, हा अष्टपैलू खेळाडू टी२० विश्वचषकादरम्यान गोलंदाजीसाठी सज्ज आहे. हार्दिक श्रीलंकेविरुद्ध गोलंदाजी करतानाही दिसला. पण याउलट यूएईमध्ये खेळल्या जाणाऱ्या आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात हार्दिकने एकही षटक टाकले नाही.
मुंबईचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी म्हटले होते, की व्यवस्थापनाने त्याला जास्त ताण द्यायचा नाही, असे ठरवले कारण त्याचा त्याच्या फलंदाजीवर परिणाम होऊ शकतो. मुंबई इंडियन्सच्या प्रशिक्षकाचे हे विधान भारतीय व्यवस्थापनाला चिंतेत आणू शकते.
२. राहुल चाहरला संघात समाविष्ट करणे
युजवेंद्र चहलला प्राधान्य न देता वेगवान लेग स्पिन गोलंदाजी करण्याच्या क्षमतेमुळे लेगस्पिनर राहुल चाहरला संघात समाविष्ट करण्यात आले. चाहरने राजस्थानसाठी तसेच मुंबई इंडियन्ससाठी आयपीएलमध्ये खूप नाव कमावले.
त्याने श्रीलंकेविरूद्ध एकदिवसीय मालिका देखील खेळली होती, त्यात त्याने पहिल्या वनडेमध्ये तीन आणि दोन टी -२० मध्ये चार विकेट्स घेतल्या होत्या. चाहरने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी केलेली प्रभावी कामगिरी, ही निवडकर्त्यांनी त्याला टी -२० विश्वचषक संघात समाविष्ट करण्याचे एक प्रमुख कारण होते.
त्याने आयपीएलच्या भारतात झालेल्या ११ सामन्यात ११ विकेट्स घेतल्या, परंतु यूएईमध्ये तो आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर निष्प्रभ ठरला आहे, त्याने २०२१ आयपीएल हंगामात युएईमध्ये चार सामन्यांमध्ये फक्त दोन विकेट घेतल्या आहेत. चाहर व्यतिरिक्त भारताकडे टी२० विश्वचषक संघात आणखी चार फिरकीपटू आहेत, पण या लेगस्पिनरचा अलीकडील फॉर्म भारतीय क्रिकेट व्यवस्थापनासाठी चिंतेचा विषय आहे.
३. सूर्यकुमार यादवचे लयीत नसणे
आयपीएल २०२० मध्ये मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवची कामगिरी उत्कृष्ट होती. आयपीएल २०१८ मध्ये ५१२, आयपीएल २०१९ मध्ये ४२४ आणि आयपीएल २०२० मध्ये ४८० धावा करणाऱ्या सूर्यकुमार यादव यंदा यूएईच्यामध्ये खराब फॉर्मत आहे.
आयपीएल २०२१ मध्ये त्याने १२ सामन्यांमध्ये १८.५० च्या सरासरीने फक्त २२२ धावा केल्या आहेत. भारताकडून खेळताना त्याने एकदिवसीय आणि टी -२० मध्ये फार कमी वेळात आपला प्रभाव पाडला आहे, परंतु आयपीएलमधील त्याचा खराब फॉर्म सध्या चिंतेचे प्रमुख कारण आहे.
४. इशान किशनला मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग इलेव्हनमधून वगळणे
खराब कामगिरीमुळे इशान किशनला मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले आहे. मात्र, संघ व्यवस्थापन अजूनही सूर्यकुमार यादवच्या पाठीशी आहे. सूर्यकुमार आणि इशान किशन हे दोन्ही खेळाडूंनी यापूर्वी चांगली कामगिरी केली होती. पण या वर्षीची गोष्ट खूप वेगळी आहे, कारण दोन्ही खेळाडूंनी खराब कामगिरी केली आहे, ज्यामुळे मुंबई इंडियन्सला मधल्या षटकांमध्ये बराच संघर्ष करावा लागला आहे. भारतीय व्यवस्थापन चिंतेत असेल, कारण त्यांनी दोन्ही खेळाडूंना त्यांच्या निर्भयबाणा आणि एक्स-फॅक्टर या क्षमतेच्या आधारावर निवडले होते.
५. भुवनेश्वर कुमारचा सध्याचा फॉर्म
इंग्लंडविरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिकेदरम्यान भारतीय संघात तात्काळ बदल करण्यात आला. जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत भुवनेश्वर कुमारने चांगली कामगिरी केली आणि पाच टी -२० मध्ये चार विकेट घेतल्या. नंतर त्याने श्रीलंका मालिकेदरम्यान तीन टी -२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पाच विकेट्स घेत हा आपला चांगला फॉर्म पुढे सुरू ठेवला.
भुवनेश्वर सध्या आयपीएलमध्ये खेळत आहे आणि तो सध्या खूप प्रभावी दिसत नाही. सनरायझर्स हैदराबादसाठी त्याने यूएईमध्ये चार सामन्यांत फक्त दोन विकेट्स घेतल्या आहेत. पॉवरप्ले आणि डेथ ओव्हरमध्ये तो कधीतरीच चमकदार कामगिरी करताना दिसला आहे. आगामी टी -२० विश्वचषक लवकरच सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत, भारतीय व्यवस्थापन आशा करेल की भुवनेश्वर लवकरच फॉर्ममध्ये परत येईल.
महत्त्वाच्या बातम्या –
काय सांगता? सामना तीन दिवसांवर असताना ‘या’ संघातील खेळाडूंचे क्रिकेट किट गेले चोरीला