---Advertisement---

IND vs SL: पहिल्या टी२०मध्ये टॉस जिंकून पहिली बॅटिंग करा अन् सामना जिंका! पाहा कसा आहे एकाना स्टेडियमचा इतिहास

On: गुरूवार, फेब्रुवारी 24, 2022 11:54 AM
---Advertisement---

लखनऊ। भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) संघात गुरुवारपासून (२४ फेब्रुवारी) ३ सामन्यांची टी२० मालिका (T20I Series) सुरू होणार आहे. या मालिकेपूर्वी भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्ध नवा पूर्णवेळ कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली वनडे आणि टी२० मालिका जिंकली आहे. त्यामुळे श्रीलंकेविरुद्धही हीच विजयी लय कायम राखण्याचा प्रयत्न भारतीय संघाचा असणार आहे.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी२० मालिकेतील पहिला सामना लखनऊमधील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियम ( Bharat Ratna Shri Atal Bihari Vajpayee Ekana Cricket Stadium) येथे होणार आहे. या मैदानाची आकडेवारी बघायची झाल्यास आत्तापर्यंत केवळ ४ आंतरराष्ट्रीय टी२० सामने या मैदानावर खेळवण्यात आले आहेत. त्यातील केवळ एकच सामना भारताने खेळला आहे. विशेष म्हणजे या चारही सामन्यात वेस्ट इंडिजचा संघ मात्र खेळला आहे.

भारताने २०१८ साली नोव्हेंबरमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध या मैदानावर टी२० सामना खेळला होता. या सामन्यात भारताने तब्बल १९५ धावांचा डोंगर उभा केला होता. ही या मैदानावरील आंतरराष्ट्रीय टी२०मधील सर्वोच्च धावसंख्या देखील आहे. त्यावेळी रोहित शर्माने शतकी खेळी करताना ६१ चेंडूत ८ चौकार आणि ७ षटकारांसह १११ धावांची खेळी केली होती. तसेच शिखर धवनने ४३ धावांची खेळी केली होती.

त्यानंतर १९६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजला २० षटकात ९ बाद १२४ धावाच करता आल्या होत्या. भारताकडून भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे भारताने हा सामना ७१ धावांनी जिंकला होता. हा या मैदानावरील पहिलाच आंतरराष्ट्रीय टी२० सामना होता. 

या सामन्यानंतर एकाना स्टेडियमवर अफगाणिस्तान विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात तीन टी२० सामने झाले. यातील दोन सामने अफगाणिस्तानने आणि एक सामना वेस्ट इंडिजने जिंकला. महत्त्वाचे म्हणजे या स्टेडियमवर झालेल्या चारही आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांत प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे. त्यामुळे नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याच्या निर्णयाला भारत आणि श्रीलंका संघ गुरुवारी प्राधान्य देऊ शकतात.

आमने-सामने कामगिरी
आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत भारत आणि श्रीलंका संघात २२ सामने झाले आहेत. त्यातील १४ सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. तसेच ७ सामने श्रीलंकेने जिंकले आहेत, तर एका सामन्याचा निकाल लागलेला नाही.

महत्त्वाच्या बातम्या – 

IND vs SL: विराट, पंत, सूर्यकुमारसारख्या खेळाडूंच्या अनुपस्थितीत पहिल्या टी२०साठी ‘अशी’ असेल भारताची ‘प्लेइंग ११’

केव्हा, कुठे आणि कसा पाहाल भारत विरुद्ध श्रीलंका पहिला टी२० सामना? जाणून घ्या सर्वकाही

द्विशतक अन् २४ फेब्रुवारीचा ‘याराना’! ‘या’ तीन खेळाडूंनी एकाच दिवशी घातली दुहेरी शतकाला गवसणी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---