दुबई। टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेतील दुसरा उपांत्य सामना गुरुवारी (११ नोव्हेंबर) पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात झाला. दुबईच्या दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ५ विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दुसऱ्यांदा प्रवेश केला आहे.
या सामन्यात पाकिस्तानने २० षटकात ४ बाद १७६ धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियासमोर १७७ धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान ऑस्ट्रेलियाने १९ व्या षटकात ५ विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले. ऑस्ट्रेलियाकडून मॅथ्यू वेडने १९ व्या षटकाच्या अखेरच्या तीन चेंडूंवर सलग षटकार ठोकत विजयावर शिक्कामोर्तब केले.
या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. त्यांचा कर्णधार ऍरॉन फिंच पहिल्याच चेंडूवर पहिल्या षटकात पायचीत झाला. त्याला शाहिन आफ्रिदीने बाद केेले. पण, यानंतर डेव्हिड वॉर्नर आणि मिशेल मार्शने डाव सांभाळत अर्धशतकी भागीदारी रचली. पण, मार्शला ७ व्या षटकात शादाब खानने असिफ अली करवी झेलबाद केले. मार्शने २२ चेंडूत २८ धावा केल्या.
पाठोपाठ ९ व्या षटकात शादाब खानने स्टीव्ह स्मिथलाही ५ धावांवर बाद केले. यानंतर मॅक्सवेलने वॉर्नरला साथ देण्याचा प्रयत्न केला. पण खेळपट्टीवर स्थिरावलेला वॉर्नरला शाबादनेच ११ व्या षटकात माघारी धाडले. वॉर्नर ३० चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकारांसह ४९ धावांवर बाद झाला. त्याचे अर्धशतक केवळ १ धावेने हुकले. एवढेच नाही १३ व्या षटकात शाबादने मॅक्सवेललाही बाद करत ऑस्ट्रेलियाला ५ वा धक्का दिला. मॅक्सवेलने ७ धावा केल्या.
पण, यानंतर मार्कस स्टॉयनिसने यष्टीरक्षक फलंदाज मॅथ्यू वेडला साथीला घेत आक्रमक खेळ केला. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी करत सामन्यात रोमांच आणला. या दोघांनी अखेरपर्यंत लढत देत १९ व्या षटकातच ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. शेवटच्या २ चेंडूत २२ धावांची ऑस्ट्रेलियाला गरज होती. यावेळी १९ व्या षटकाच्या पहिल्या तीन चेंडूत ऑस्ट्रेलियाला केवळ ४ धावा करता आल्या. त्यात तिसऱ्या चेंडूवर वेडचा झेल पाकिस्तानकडून सुटला.
वेडने त्याला मिळालेल्या या जीवदानाचा पुरेपूर फायदा घेत शाहिन आफ्रिदी गोलंदाजी करत असलेल्या या षटकाच्या अखेरच्या तीन चेंडूंवर तीन खणखणीत षटकार ठोकले आणि ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. वेड १७ चेंडूत २ चौकार आणि ४ षटकारांसह ४१ धावांवर नाबाद राहिला, तर मार्कस स्टॉयनिस ३१ चेंडूत २ चौकार आणि २ षटकारांसह ४० धावांवर नाबाद राहिला.
पाकिस्तानकडून शादाब खानने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तसेच शाहिन आफ्रिदीने १ विकेट घेतली.
रिझवान-जमानचे अर्धशतक
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पाकिस्तान संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला. पाकिस्तानकडून मागील काही दिवसांपासून जबरदस्त फॉर्ममध्ये असणारे बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी या सामन्यातही दमदार सुरुवात केली. या दोघांनी सुरुवातीपासून चांगला खेळ करताना अर्धशतकी सलामी दिली. त्यांनी पहिल्या ९ षटकात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना मोठे यश मिळू दिले नाही. पण अखेर १० व्या षटकात ऍडम झम्पाने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला बाद करत ही जोडी फोडली.
बाबर आझमने ३४ चेंडूत ५ चौकारांसह ३९ धावांची खेळी केली. त्याचा झेल डेविड वॉर्नरने घेतला. बाबर आणि रिझवानने ७१ धावांची सलामी भागीदारी केली. पण, त्यानंतर फखर जमानने रिझवानला चांगली साथ देत पाकिस्तानचा डाव पुढे नेला. दरम्यान, रिझवानने ४१ चेंडूत वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केले. हे त्याच्या या स्पर्धेतील तिसरे अर्धशतक ठरले. रिझवानने फखरसह पाकिस्तानचा डाव पुढे नेताना ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना विकेटसाठी संघर्ष करायला लावला.
पण, अखेर १८ व्या षटकात मिशेल स्टार्कने रिझवानला स्टीव्हन स्मिथकरवी झेलबाद केले. रिझवानने ५२ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारांसह ६७ धावा केल्या. त्याच्या पुढच्याच षटकात असिफ अली पहिलाच चेंडू खेळताना पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर स्मिथकडेच झेल देत बाद झाला.
अखेरच्या षटकात शोएब मलिकला मिशेल स्टार्कने १ धावेवर त्रिफळाचीत केले. पण या षटकातील चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर फखरने खणखणीत षटकार ठोकले आणि आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यामुळे पाकिस्तानने २० षटकात ४ बाद १७६ धावा केल्या. फखर ३२ चेंडूत ५५ धावांवर नाबाद राहिला, त्याने या खेळीत ३ चौकार आणि ४ षटकार मारले. मोहम्मद हाफिज १ धावेवर नाबाद राहिला.
ऑस्ट्रेलियाकडून मिशेल स्टार्कने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. तसेच पॅट कमिन्स आणि ऍडम झम्पाने प्रत्येकी १ विकेट घेतली.
असे आहेत ११ जणांचे संघ –
पाकिस्तान: मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), बाबर आझम (कर्णधार), फखर जमान, मोहम्मद हाफीज, शोएब मलिक, आसिफ अली, शादाब खान, इमाद वसीम, हसन अली, हरिस रौफ, शाहीन आफ्रिदी
ऑस्ट्रेलिया: डेव्हिड वॉर्नर, ऍरॉन फिंच (कर्णधार), मिशेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, मॅथ्यू वेड (यष्टीरत्रक), पॅट कमिन्स, मिशेल स्टार्क, ऍडम झाम्पा, जोश हेझलवूड