पुणे: थायलंड प्री रॅली मालिकेतील तिसऱ्या फेरीत आघाडी घेण्यासाठी कार वेगाने चालविण्याच्या प्रयत्नात कॉलम स्टीअरिंग पिनीयन बिघडल्यामुळे संजय टकलेला माघार घ्यावी लागली, पण थायलंडमधील रॅलींमध्ये भाग घेताना सदैव खिलाडूवृत्ती प्रदर्शित केल्यामुळे त्याला खास पुरस्कार देण्यात आला.
फेत्चाबून प्रांतात रविवारी ही रॅली झाली. संजयने डेलो स्पोट्स संघाने सुसज्ज केलेली इसुझू डीमॅक्स युटीलीटी कार चालविली. थान्याफात मिनील त्याचा नॅव्हीगेटर होता. तीन स्टेज प्रत्येकी तीन वेळा चालविणे असे रॅलीचे स्वरुप होते.
या स्टेजेसचे अंतर अनुक्रमे 14, 4 व 3 किलोमीटर असे होते. संजयने पहिली स्पेशल स्टेज 14 मिनिटे 49 सेकंद, दुसरी 5.11, तर तिसरी 3.17 सेकंद वेळेत पूर्ण केली होती. त्यानंतर त्याने प्रत्येक स्पेशल स्टेजच्या वेळेत अनुक्रमे 14.37, 4.59 व 3.03 सेकंद असी सुधारणा केली होती. सहाव्या स्पेशल स्टेजला त्याची वेळ संयुक्त तिसऱ्या क्रमांकाची होती.
संजयने सांगितले की, रविवारी पाऊस पडला होता. पहिल्या स्टेजला आमची वेळ चांगली होती. दुसऱ्य़ा स्टेजला आम्ही केवळ सहा सेकंदांनी मागे होतो. सर्व्हिसच्यावेळी नऊ सेकंदांची पिछाडी होती, पण त्यावेळी कार क्षमतेच्या 80 टक्के इतकीच साथ देत होती.
दुसऱ्या पासच्यावेळी डाव्या बाजूचा ड्राईव्ह शाफ्ट बिघडला. त्यामुळे वेगवान कॉर्नरला कार डावीकडे वळविताना अडचणी येत होत्या. एक मिनिटांपेक्षा जास्त पिछाडी असली तरी तीन स्टेज बाकी होत्या, पण तेव्हा तिसऱ्या पासपूर्वी केवळ दहा मिनिटांची सर्व्हिस होती. त्यात बिघाड दुरुस्त होणे शक्य नव्हते. माऊटिंग आणि रॅक कॉलम बदलायला जास्त वेळ लागतो. त्यामुळे आम्हाला माघार घ्यावी लागली.
संजयने पहिली स्पेशल स्टेज 14 मिनिटे 49 सेकंद, दुसरी 5.11, तर तिसरी 3.17 सेकंद वेळेत पूर्ण केली होती. त्यानंतर त्याने प्रत्येक स्पेशल स्टेजच्या वेळेत 14.37, 4.59 व 3.03 सेकंद असी सुधारणा केली होती. तीन स्टेज प्रत्येकी तीन वेळा चालविणे असे रॅलीचे स्वरुप होते. सहाव्या स्पेशल स्टेजला त्याची वेळ संयुक्त तिसऱ्या क्रमांकाची होती.
संजयला गुणतक्त्यात आघाडी घेण्याची चांगली संधी होती. तो अथ्थायुत पात्ताप्रेदापाद याच्यापेक्षा 19 गुणांनी मागे होता. या फेरीपूर्वी अथ्थायुतचे 60, तर संजयचे 41 गुण होते. या मालिकेतील आता एकच फेरी बाकी आहे. नॅव्हीगेटर थान्याफात याला विजेतेपदाची संधी आहे. या फेरीचे गुण अद्याप जाहीर झालेले नाहीत.
दरम्यान, कारकिर्दीच्या प्रारंभापासून थायलंडमध्ये विविध प्रांतातील रॅलींमध्ये भाग घेतलेल्या संजयला खास पुरस्कार देण्यात आला. खिलाडूवृत्तीसाठी त्याला मानचिन्ह देण्यात आले.