तालिबानच्या अफगाणिस्तानवरील अधिकारानंतर तेथील परिस्थिती अत्यंत नाजूक स्थितीत आहे. इथल्या अनेक गोष्टींवर याचा परिणाम झाला आहे. तसेच अफगाणिस्तानमधील खेळाच्या भविष्यावर देखील याचा परिणाम झालेला दिसत आहे. याबाबत तालिबानने क्रिकेटला संपूर्ण पाठिंबा असल्याचे वक्तव्य केले होते. मात्र, तेथील परिस्थिती पाहता अजूनही अफगाणिस्तान क्रिकेटच्या भविष्यावर धोक्याची घंटा आहे. अफगाणिस्तानला एकमात्र कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जायचे होते. मात्र अशी स्थिती पाहता हा दौरा होण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. परंतु याबाबत तालिबानने आता एक अध्यादेश जारी केला आहे.
अफगाणिस्तानला २७ नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या क्रिकेट सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जायचे आहे. यापूर्वी अफगाणिस्तानचे सांस्कृतिक समितीचे उपाध्यक्ष अहमदुल्ला वासिकने याबाबत वक्तव्य केले आहे.
ज्यामध्ये ते म्हणाले, “ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यात होणारा एकमात्र कसोटी सामना निर्धारित वेळापत्रकानुसारच होणार आहे. आधीपासून निर्धारित असलेल्या सर्व सामन्यात कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही. अफगाणिस्तान क्रिकेट संघ इतर आंतरराष्ट्रीय संघासोबत खेळू शकते. भविष्यात आम्ही सर्व देशांसोबत चांगले संबंध प्रस्थापित करू इच्छित आहोत. जेव्हा सर्व देशांसोबत चांगले संबंध प्रस्थापित होतील, तेव्हा अफगाणिस्तानचे खेळाडू ऑस्ट्रेलियाला रवाना होऊ शकतात आणि ते देखील इथे येऊ शकतात.”
तर दुसरीकडे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तान विरुद्ध होणाऱ्या कसोटी सामन्यासाठी आपली तयारी देखील चालू केली आहे. याबाबतच क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या एका प्रवक्त्याने याबाबत सांगितले की, “होबार्टमध्ये खेळविण्यात येणाऱ्या या सामन्याच्या योजनेवर काम चालू आहे. तसेच क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान क्रिकेट संघ योग्य दिशेत आहेत.”
तालिबानने संपूर्ण पाठिंबा असल्याचे फर्मान काढले असले, तरी अफगान क्रिकेटच्या भविष्यावर सध्या धोक्याची घंटा आहे. अफगाणिस्तानच्या यजमानपदात पाकिस्तानविरुद्ध मालिकेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, ही मालिका आता अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. तसेच अफगाणिस्तानचे येणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये खेळण्याबाबत देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. त्यामुळे अशा स्थितीत तालिबानच्या सत्तेत अफगाणिस्तान क्रिकेटमध्ये अनेक बदल होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, अफगाणिस्तानचा संघ टी-२० विश्वचषक स्पर्धेत ब गटात आहे. जिथे त्याच्यासोबत भारत, पाकिस्तान आणि न्यूझीलंडचा संघ देखील आहे. जर अफगाणिस्तानमधील सर्व स्थिती आवाक्यात आली, तर अफगाणिस्तानचे खेळाडू लवकरच टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या तयारीला लागतील.
महत्वाच्या बातम्या –
–खराब फॉर्मातील अजिंक्यच्या हातून निसटणार उप-कर्णधारपद, मग रोहितच्या खांद्यावर येणार ही जबाबदारी?
–इंग्लंडचा मोठा निर्णय; पितृत्व रजेमुळे बटलर उर्वरित मालिकेतून बाहेर, ‘हा’ खेळाडू नवा उपकर्णधार
–चौथ्या कसोटीतील ५ दिवस कसे असेल लंडनचे हवामान? पावसाची आहे दाट शक्यता