2024च्या आयसीसी टी20 विश्वचषकात (ICC T20 World Cup) भारतानं चमकदार कामगिरी करुन ट्राॅफी उंचावली. त्यावेळी राहुल द्रविड (Rahul Dravid) भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. त्यानंतर द्रविड यांचा कार्यकाळ संपला. पण टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर, त्यांनी जोरदार सेलिब्रेशन केलं. द्रविड डोळे मिटून टी20 वर्ल्ड कपची ट्रॉफी हातात धरुन सर्व शक्तीनं ओरडत होते. द्रविडनं अलीकडेच त्याच्या सेलिब्रेशनबद्दल मोकळेपणाने सांगितले आणि त्यांच्या मुख्य प्रशिक्षाच्या कारकीर्दीत कोणता दिवस कठीण कठीण होता, याचा त्यांनी खुलासा केला.
राहुल द्रविडनं (Rahul Dravid) स्टार स्पोर्ट्सशी बोलताना सांगितलं की, “आम्ही अनेक वेळा मोठ्या ट्रॉफीच्या जवळ येत होतो. आम्ही टी20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचलो, आम्ही जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळलो आणि आम्ही एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीतही होतो, पण आमचा संघ ट्रॉफी मिळविण्यासाठी अंतिम रेषा पार करु शकला नाही. मात्र, टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर मला माझ्या संघासाठी आणि सर्वांसाठी खूप चांगले वाटत होते.”
पुढे बोलताना राहुल द्रविड (Rahul Dravid) म्हणाले की, “ज्यांनी गेली अडीच वर्षे खूप मेहनत केली, त्यामुळेच मी त्या पद्धतीने आनंदोत्सव साजरा करत होतो, एकंदरीतच आराम आणि आनंद बाहेर पडत होता, मात्र एक गोष्ट अशी आहे की, मी त्या पद्धतीने सेलिब्रेशन करण्यासाठी थोडे सावध राहावे लागेल, माझा मुलगा माझ्याकडे बघत असेल आणि म्हणेल माझे वडील काय करत आहेत हे मला माहीत नाही (हसत).”
राहुल द्रविड म्हणाले, “दक्षिण आफ्रिका दौरा आमच्यासाठी खूप कठीण दौरा होता. सेंच्युरियनमध्ये त्या दौऱ्यातील पहिली कसोटी आम्ही जिंकली. दक्षिण आफ्रिकेत आम्ही कधीही कसोटी मालिका जिंकलेली नाही हे आम्हा सर्वांना माहीत आहे. ही आमच्यासाठी मोठी संधी होती. मात्र, एक गोष्ट अशी आहे की, त्यावेळी आमच्या संघात अनेक वरिष्ठ खेळाडू उपस्थित नव्हते. त्यानंतर रोहित शर्मा दुखापतीमुळे संघाबाहेर होता. इतर काही वरिष्ठ खेळाडूही संघात नव्हते.”
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, “उर्वरित दोन कसोटी सामने अगदी जवळचे होते. दोन्ही कसोटी सामन्यांच्या तिसऱ्या डावात आम्हाला मोठी संधी होती. मात्र, दक्षिण आफ्रिकेच्या संघाने त्यावेळी खूपच चांगला खेळ दाखवला आणि चौथ्या डावात त्यांनी चांगला पाठलाग केला. भारतीय संघाचा प्रशिक्षक असताना हे माझ्यासाठी सर्वात कठीण दिवस होते, असे मी म्हणेन. मात्र, तिथून मला खूप काही शिकायला मिळाले. तिथे आम्हाला आमच्या खेळाबद्दल आणि आम्हाला काय काम करण्याची गरज आहे याबद्दल बरेच काही शिकायला मिळाले.”
राहुल द्रविड (Rahul Dravid) नोव्हेंबर 2021 मध्ये भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक बनले होते. 2024च्या टी20 विश्वचषकानंतर त्यांचा मुख्य प्रशिक्षक पदाचा कार्यकाळ संपला. त्यांनी पुढे त्यांचा कार्यकाळ वाढवला नाही. आता भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
..तर या कारणामुळे रिकी पाँटिंगनं दिल्ली कॅपिटल्सशी नातं तोडलं; स्वत:च केला धक्कादायक खुलासा
“गप्प बसता, लाज नाही वाटत…”, बांगलादेशात होणाऱ्या हिंदूंवरील अत्याचारांवर पाकिस्तानी क्रिकेटपटू संतप्त
धोनी आयपीएलमध्ये अनकॅप्ड खेळाडू म्हणून खेळणार? आर अश्विनची प्रतिक्रिया चर्चेत