कोरोना महामारीनंतर भारतातील पहिली क्रिकेट स्पर्धा म्हणून सुरू झालेली सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफी तमिळनाडूने आपल्या नावे केले. बडोद्यावर ७ गड्यांनी मात करत तमिळनाडूने हे विजेतेपद मिळवले. युवा फिरकीपटू एम सिद्धार्थ तमिळनाडूच्या विजयाचा शिल्पकार ठरला.
तामिळनाडूची नियंत्रित गोलंदाजी
अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बडोद्याचा डाव १२० धावांवर आटोपला. तमिळनाडूचा युवा फिरकीपटू एम सिद्धार्थने आपल्या चार षटकांत २० धावा देऊन चार महत्वपूर्ण बळी मिळवले. बडोद्यासाठी विष्णू सोलंकीने सर्वाधिक ४९ धावा केल्या. ३६ धावांवर सहा गडी बाद झाल्यानंतर सोलंकी व अतीत सेठ यांनी सातव्या गड्यासाठी ५८ धावांची भागीदारी करत, बडोद्याला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली.
तमिळनाडूचा यशस्वी पाठलाग
तमिळनाडूला विजेतेपदासाठी प्रति षटक सहा धावा बनविण्याचे आव्हान होते. सलामीवीर हरी निशांत व कर्णधार दिनेश कार्तिक यांनी प्रत्येकी ३५ व २२ धावा करत सामना तमिळनाडूच्या बाजूने झूकता ठेवला. बाबा अपराजितने एक बाजू लावून धरत नाबाद २९ धावा फटकावल्या. शाहरुख खानने लुकमन मेरीवालाने टाकलेल्या १८ व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर चौकार वसूल करत तमिळनाडूला विजेतेपद मिळवून दिले. चार बळी मिळवणारा सिद्धार्थ सामनावीर ठरला.
तमिळनाडूचे दुसरे विजेतेपद
तमिळनाडूचे हे दुसरे सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफी विजेतेपद आहे. यापूर्वी २००६-२००७ चा हंगामा तमिळनाडूमध्ये आपले पहिले विजेतेपद पटकावण्याची किमया केली होती. विशेष म्हणजे त्यावेळी देखील दिनेश कार्तिक संघाचा कर्णधार होता. मागील वर्षी अंतिम फेरीत कर्नाटककडून पराभूत झाल्याने तमिळनाडू विजेतेपद पटकावून शकला नव्हता.