बांगलादेशचा डावखुरा सलामीवीर तमीम इक्बाल याने आज (३ फेब्रुवारी) जागतिक क्रिकेटमध्ये एक मोठा विक्रम नोंदविला. तो बांगलादेशकडून क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. अशाप्रकारे, तो जगातील असा पहिला फलंदाज ठरला ज्याने एकाच वेळी आपल्या देशासाठी क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपात सर्वाधिक धावा केल्या आहेत. दुर्दैवाने त्याचा हा विक्रम अवघे काही तासच टिकू शकला.
पहिल्या कसोटीत केली विक्रमी कामगिरी
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात तमीम इक्बालने ही कामगिरी केली. सलामीवीर म्हणून फलंदाजीला आलेल्या तमीमने पहिल्या डावात अवघ्या ९ धावा काढल्या. त्याला केमार रोचने त्रिफळाचीत केले. मात्र बाद होण्यापूर्वी, तमीम बांगलादेशकडून कसोटी, वनडे आणि टी२० या तीनही स्वरूपात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला.
काही तास टिकला विक्रम
तमिमने वैयक्तिक नववी धाव घेत बांगलादेशसाठी कसोटी क्रिकेटमध्ये ४,४१३ धावा काढणाऱ्या यष्टीरक्षक मुशफिकूर रहीमला मागे टाकले. परंतु, त्यानंतर पाचव्या स्थानी फलंदाजीला आलेल्या रहीमने ३८ धावा ठोकून पुन्हा एकदा बांगलादेशसाठी सर्वाधिक कसोटी धावा बनविणारा खेळाडू होण्याचा मान मिळवला.
पहिल्या दिवशी गाजवले बांगलादेशने वर्चस्व
कोरोना महामारीनंतर प्रथमच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असलेल्या बांगलादेश संघाने या कसोटीच्या पहिल्या दिवशी वर्चस्व गाजवत ५ बाद २४२ धावा बनविल्या. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर सलामीवीर शदमन इस्लामने अर्धशतकी खेळी केली. रहीमने ३८ तर कर्णधार मोमिनुल हकने २६ धावांचे योगदान दिले. दिवसाचा खेळ संपला तेव्हा शकीब अल हसन ३९ तर लिटन दास ३४ धावांवर नाबाद खेळत आहेत. वेस्ट इंडीजकडून फिरकीपटू जोमेल वेरीकनने सर्वाधिक तीन बळी मिळविले.
महत्वाच्या बातम्या:
इंग्लिश गोलंदाजांच्या मदतीला धावला हा दिग्गज, दिला मोलाचा सल्ला
सीएसकेला मिळाला नवा स्पॉन्सर?, इतक्या कोटींचा करार झाल्याची शक्यता
क्रिकेटच्या मैदानावर कोरोनाचे पुनरागमन, राष्ट्रीय प्रशिक्षकाला घेतले विळख्यात