जालंधर। महाराष्ट्रच्या रेश्माने चमकदार कामगिरी करत टाटा मोटर्स वरीष्ठ गट कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत 62 किलो वजनीगटात कांस्यपदकाची कमाई केली. यासोबतच विनेश, साक्षी, अनिता यांनी आपापल्या गटात चमक दाखवत सुवर्णपदक मिळवले.
रेश्माची पहिलीच कुस्ती हरियाणाच्या राधिका हिच्या बरोबर होती यामध्ये रेश्मा 8-3 अशी आघाडीवर होती पण शेवटच्या 15 सेकंदात राधिकाने चार गुणांची कमाई केली व यामुळे लढत 8-8 अशी बरोबरीत राहिली. यामुळे रेश्माचा निसटता पराभव झाला.पण, रिपॅचस राउंडमध्ये रेश्मा ला हिमाचलच्या सुमन ठाकुर सोबत बाय मिळाला. यानंतर कांस्यपदक लढतीत तिने उत्तर प्रदेशच्या फ्रीडम यादवला चितपट करुन पदक मिळवले. रेश्माला लक्ष्य फाउंडेशनचा पाठिंबा आहे.
अन्य लढतीमध्ये हरयाणाच्या अनिताने रेल्वेच्या दिव्या काकरानला 68 किलो वजनी गटात पराभूत केले. तिच्या सुवर्ण कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले. त्यामुळे राष्ट्रकुल कांस्यपदक विजेता दिव्या काकरानला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. रेल्वेच्या विनेशने 20 वर्षीय हरयाणाच्या अंजूला 7-3 अशा फरकाने पराभूत करत राष्ट्रीय स्पर्धेतील आपले सलग दुसरे सुवर्णपदक मिळवले.
रिओ ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या साक्षीने 62 किलो वजनीगटात सुवर्णपदक मिळवले. हरयाणाच्या राधिकाला तिने 4-2 असे नमविले. पंजाबच्या गुरशरण कौरने 76 किलो वजनी गटात हरयाणाच्या पूजाला 4-2 अशा फरकाने पराभूत केले. चंदिगढच्या नीतूला 57 किलो वजनीगटात सरिता मोरकडून पराभूत व्हावे लागल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. 65 किलो गटाच्या अंतिम सामन्यात हरयाणाच्या निशाने रेल्वेच्या नवजोतवर 4-1 असा विजय मिळवला. हरयाणाच्या मुलींनी चमकदार कामगिरी करत पदक तालिकेत 215 गुणांसह आघाडी घेतली.