पुणे: पुण्यात लवकरच सुरु होत असलेल्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेतील पुरुष दुहेरीत रोहन बोपन्ना आणि दिवीज शरण ही आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती जोडी प्रमुख आकर्षण ठरेल, अशी घोषणा स्पर्धेच्या संयोजकांनी आज केली.
एटीपी टूरच्या आगामी मौसमात आपण एकत्रितपणे खेळणार असल्याचे या जोडीने नुकतेच जाहीर केले आहे.
एटीपी दुहेरी क्रमवारीत शरणने कारकिर्दीतील सर्वोत्तम अशा 36व्या स्थानावर झेप घेतली आहे. पुण्यात सुरु होणाऱ्या या मौसमातील उदघाटनाच्या एटीपी वर्ल्ड टूर स्पर्धेसाठी या जोडीला पुरुष दुहेरीत अग्रमानांकन देण्यात आले आहे.
टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेचे संचालक प्रशांत सुतार याविषयी माहिती देताना म्हणाले कि, या स्पर्धेत भारतीय जोडीला अग्रमानांकन मिळणे, ही खुपच मोठी गोष्ट आहे. आशियाई सुवर्ण विजेत्या बोपन्ना व शरण या जोडीने स्पर्धेतील सहभाग निश्चित केला असून अग्रमानांकन पटकावले आहे, ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
या स्पर्धेत पुणेकर टेनिस शौकिनांना पाचव्या मानांकित मार्सेल व ग्रेरार्ड या ग्रेनॉलर्स बंधूंचे कौशल्य पाहण्याची संधी मिळणार आहे. मार्सेल हा दुहेरी क्रमवारीतील सर्वोच्च मानांकित खेळाडू सुद्धा आहे. गेल्या स्पर्धेत पुरव राजाच्या साथीत खेळलेल्या लिएंडर पेसने यंदाच्या स्पर्धेत मेक्सिकोच्या निगेल एंजेल रेयेस-व्हेरेला याच्याबरोबर, तर गेल्या स्पर्धेत बोपन्नासोबत खेळलेल्या जीवन नेदुचेझियनने यावर्षी जागतिक क्रमवारीत 65व्या क्रमांकवर असलेल्या अमेरिकेच्या निकोलस मनरोशी याच्यासोबत दुहेरी गटात खेळणार आहे.
या स्पर्धेला 1996 मध्ये प्रारंभ झाला आणि गेली 21वर्षे ही स्पर्धा चेन्नई येथे आयोजित करण्यात आली होती. 2018पासून हि स्पर्धा पुण्यात आयोजित करण्यात आली असून जागतिक क्र.6चा खेळाडू केविन अँडरसन, जागतिक क्र.7 व माजी अमेरिकन ओपन विजेता खेळाडू मेरिन चिलीच आणि फ्रांसचा गतविजेता सिमॉन जाईल्स या खेळाडूंचा यंदाच्या एकेरी विजेतेपदाच्या आव्हानविरांमध्ये समावेश आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून या दिग्गज खेळाडूंचे कौशल्य अनुभवण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे.