आजकाल जगभरात टी२० क्रिकेटचे वारे वाहत असलेले पाहायला मिळते. क्रिकेटच्या या प्रकारात केवळ २० षटकांत जास्तीत जास्त धावा बनवता याव्या यासाठी अनेकदा फलंदाज घाम गाळत असल्याचे दिसून येते. मात्र, तेव्हा काय होईल जेव्हा एका टी२० सामन्यांत एखादा संघ केवळ ८ धावा करत सर्वबाद होईल. खरं वाटत नसलं, तरी ही घटना घडलीये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये.
ही घटना १९ वर्षाखालील महिला टी२० आशिया चषकाच्या क्लालिफायर सामन्यात घडली आहे. यूएई विरुद्ध नेपाळ (UAE vs Nepal) या दोन संघात सुरू असलेल्या सामन्यात हे हास्यास्पद चित्र पाहायला मिळाले. नेपाळचा महिला संघ प्रथम फलंदाजीसाठी खेळपट्टीवर आला, तेव्हा दुसऱ्याच षटकांत पहिला झटका लागला. त्यानंतर मात्र नेपाळच्या संघातील फलंदाजीला गळती लागली आणि बघता बघता सामन्याच्या ९व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर नेपाळचा पूर्ण संघ बाद झाला. यावेळी त्यांना केवळ ८ धावाच करता आल्या.
नेपाळने या सामन्यानंतर टी२० क्रिकेटमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर बाद होण्याचा निराशाजनक विक्रम आपल्या नावे केला आहे. नेपाळला गुडघे टेकायला भाग पाडणाऱ्या यूएई संघाने मात्र केवळ ९ धावांचे असणारे लक्ष्य फलंदाजीला आल्यानंतर केवळ ७ चेंडूत पूर्ण केले. त्यामुळे यूएईला या सामन्यांत १० विकेट्स आणि तब्बल ११३ चेंडू राखत मोठा विजय मिळाला.
दरम्यान, याआधीच्या सामन्यात यूएईच्या संघाने भूतानविरुद्ध खेळत असताना १६० धावांनी मोठा विजय मिळवला होता. त्यावेळी संघाने प्रथम फलंदाजी करत २०२ धावा केल्या होत्या. या मोठ्या धावसंंख्येचा पाठलाग करणाऱ्या भूतानच्या संघाला मात्र ७ विकेट्स गमावत केवळ ४२ धावा करता आल्या. त्यामुळे यूएईला एक मोठा विजय मिळाला होता. शिवाय लागोपाट दोन सामन्यांत मोठ्या फरकाने विजय मिळवल्याने यूएई संघाने स्पर्धेत वर्चस्व गाजवले आहे. सोबतच यूएईचे फलंदाज आणि गोलंदाज दोन्ही चांगल्या फॉर्ममध्ये असल्याचेही यातून स्पष्ट झाले आहे.
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘डॉन ब्रॅडमनच्या मुलानेही नाव बदलले होते, तूही…’ कपिल देव यांचा अर्जुन तेंडुलकरला सल्ला
दक्षिण आफ्रिकी कर्णधार पाहतोय मोठी स्वप्ने; म्हणे, आयपीएलमध्ये खेळायचंय, तेही कर्णधार म्हणून
पुन्हा टीम इंडियाच्या जर्सीत खेळण्यासाठी ‘हा’ खेळाडू उत्सुक, वेळ दिल्याने बीसीसीआयलाही म्हटले थँक्यू