---Advertisement---

वेस्ट इंडीजला क्लीन स्वीप दिल्यानंतर कर्णधार रोहितची खास प्रतिक्रिया, आगामी मालिकेत ‘यांना’ मिळणार संधी

Rohit-Sharma
---Advertisement---

भारत आणि वेस्ट इंडीज (India vs West Indies T20 series) यांच्यातील तीन सामन्यांची टी-२० मालिका रविवारी (२० फेब्रुवारी) संपली. मालिकेतील तिन्ही सामने कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळले गेले. शेवटच्या सामन्यात भारताने १७ धावांनी विजय मिळवला आणि वेस्ट इंडीजला क्लीन स्वीप (३-०) दिला. रविवारच्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने महत्त्वाची प्रतिक्रिया दिली.

मध्यक्रमातील फलंदाजाचे केले रोहितने कौतुक
वेस्ट इंडीजविरुद्ध सलग सहावा विजय मिळवल्यानंतर रोहित म्हणाला, “या संघात असे अनेक खेळाडू आहेत, जे लक्ष्याचा पाठलाग करण्यात माहिर आहेत. आम्हाला दोन्ही विभागांमध्ये चांगले प्रदर्शन करायचे आहे. आमचा मध्यक्रम खूप नवा आहे, त्यामुळे पहिल्यांदा फलंदाजी किंवा गोलंदाजी करताना चांगले प्रदर्शन करू इच्छितो. मला माहिती आहे की, लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आम्ही एक मजबूत संघ आहोत. संघाच्या रूपात आम्ही सर्व खेळाडूंकडून जी अपेक्षा करत होते, त्यांनी तसेच प्रदर्शन केले. एकदिवसीय मालिकेत मध्यक्रमातील फलंदाजांनीच आम्हाला अडचणीतून बाहेर काढले होते आणि मला याचा अभिमान आहे.”

‘या’ खेळाडूंना मिळणार आगामी मालिकेत संधी
पुढे बोलताना कर्णधार रोहित म्हणाला, “एकदिवसीय मालिकेत मध्यक्रमातील प्रदर्शन एक सकारात्मक बाब होती. तसेच मी आमच्या वेगवान गोलंदाजांमुळेही प्रभावित झालो होतो. आजही तुम्ही पाहिले, त्यांनी चांगला खेळा दाखवला. वेस्ट इंडीजविरुद्ध तुमच्या गोलंदाजांसमोर नेहमी एक आव्हान असते. मी मान्य करतो की, मागच्या दोन सामन्यांमध्ये आम्ही आमच्या लक्ष्याचा चांगल्या प्रकारे बचाव केला. आगामी मालिकेत आम्ही बाहेर बसलेल्या खेळाडूंना संधी देऊ इच्छितो. टी-२० विश्वचषकाला लक्षात हेऊन आम्ही आमचे निर्णय घेऊ. मी विरोधी संघाचा विचार करणार नाही. आम्हाला आमच्या क्षेत्ररक्षणावर काम करायचे आहे आणि आम्ही त्यावर काम करू.”

दरम्यान, उभय संघातील शेवटच्या टी-२० सामन्याचा विचार केला, तर वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने ५ विकेट्सच्या नुकसानावर १८४ धावा केल्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडीज संघ २० षटकात ९ विकेट्सच्या नुकासानावर १६७ धावांपर्यंत पोहोचू शकला. परिणामी भारताने १७ धावा राखून विजय मिळवला. एकंदरित पाहता वेस्ट इंडीजला भारत दौऱ्यात एकही विजय मिळवता आला नाही. भारताने एकदिवसय आणि टी-२० मालिकेतील सर्वच्या सर्व सामने जिंकले.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---