भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील तिसरा सामना काल मंगळवारी (28 जानेवारी) राजकोटमधील निरंजन शाह स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात टीम इंडियाला 26 धावांनी पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने आपण कुठे चुकलो हे सांगितले. सूर्याने सांगितले की त्याचा एक निर्णय संघासाठी योग्य ठरला नाही.
टीम इंडियाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सूर्याने सांगितले की त्याला वाटले होते की दव नंतर येईल. ज्यामुळे दुसऱ्या डावात फलंदाजी करणे सोपे होईल. परंतु तसे झाले नाही. याशिवाय सूर्याने इंग्लंडचा स्टार फिरकीपटू आदिल रशीदचे कौतुक केले. सुमारे 14 महिन्यांनंतर टीम इंडियात परतणाऱ्या मोहम्मद शमीबद्दल सूर्याने सांगितले की, भविष्यात तो चांगली कामगिरी करेल अशी आशा आहे.
सामन्यानंतर बोलताना भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला, “मला वाटलं होतं की नंतर थोडा दव पडेल. मला वाटलं की हार्दिक आणि अक्षर फलंदाजी करत असताना सामना आपल्या हातात होता. पण सर्व श्रेय आदिल रशीदला जाते. त्याने उत्कृष्ट गोलंदाजी केली. म्हणूनच तो एक जागतिक दर्जाचा गोलंदाज आहे. त्याने आम्हाला स्ट्राईक रोटेट करू दिला नाही. म्हणूनच आमच्या संघात बरेच फिरकी गोलंदाज होते.”
सूर्या पुढे बोलताना म्हणाला, “टी20 सामन्यांमध्ये आपण नेहमीच काहीतरी शिकतो. फलंदाजीच्या दृष्टिकोनातून आपल्याला शिकायला मिळाले. त्यामुळे झालेल्या चुकीमधून आम्ही शिकू. मला आशा आहे की शमी भविष्यात चांगली कामगिरी करेल. सोबतच वरुण चक्रवर्ती सराव सत्रादरम्यान खूप मेहनत घेत आहे. तो शिस्तबद्ध आहे आणि त्याच्या कष्टाचे फळ मैदानावर मिळत आहे.”
तिसरा टी20 सामना जिंकून इंग्लंडने मालिकेत स्वतःला कायम ठेवले आहे. तथापि, भारत 2-1 ने पुढे आहे. आता मालिकेतील चौथा सामना शुक्रवार 31 जानेवारी रोजी पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जाईल.
हेही वाचा-
भारतीय खेळाडूंचा ICC पुरस्कारांमध्ये डंका, बुमारहच्या खात्यात दोन, तर…
वरुण चक्रवर्तीच्या नावे नोंदवला लाजीरवाणा विक्रम, टी20 मधील पहिलाच इतका दुर्दैवी खेळाडू
संघ व्यवस्थापनाचा ढिसाळ निर्णय आणि…., जाणून घ्या भारताच्या पराभवाची पाच मोठी कारणं