नुकताच अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात पार पडलेला चौथा कसोटी सामना भारताने एक डाव आणि २५ धावांनी जिंकला. यासह ३-१ च्या फरकाने भारतीय संघाने कसोटी मालिकाही खिशात घातली. सोबतच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही धडक मारली. भारतीय संघाच्या या विजयात यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने सिंहाचा वाटा उचलला. आता याच पंतची भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भरभरून प्रशंसा केली आहे.
पंतने शतक झळकावत इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याचा कायापालट केला. त्याने लक्ष्याचा पाठलाग करताना केलेली खेळी, घरच्या मैदानावर सहाव्या क्रमांकावर कोणत्या फलंदाजाने केलेली सर्वश्रेष्ट आक्रमक खेळी असल्याचे शास्त्रींनी सांगितले आहे.
रिषभ पंतची शतकी खेळी सर्वोत्कृष्ट होती
पंतची प्रशंसा करताना शास्त्री म्हणाले की, “या यष्टीरक्षक फलंदाजाने खूप कठोर परिश्रम केले आणि सर्वांना आपले खरे रुप दाखवले. त्याच्या मागील ३-४ महिन्यांच्या मेहनतीचे फळ जगासमोर आले आहे. मी आतापर्यंत कोणत्या भारतीय फलंदाजाला घरेलू मैदानावर खासकरुन सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना अशी खेळी केलेले पाहिले नाही. कारण या क्रमांकावर फलंदाजीला येईपर्यंत खेळपट्टीवर चेंडूला वळण मिळायला सुरुवात होते, त्यामुळे फलंदाज सहसा या क्रमांकावर संघर्ष करताना दिसतात. परंतु पंतने केलेली खेळी धावांचा पाठलाग करताना कोणी केलेली आजवरची सर्वोत्कृष्ट खेळी होती.”
रिषभ पंतबरोबर सक्तीने वागावे लागले
“आम्ही पंतबरोबर खूप सक्तीने वागलो. आम्ही त्याला जाणीव करुन दिली की, कोणतीही गोष्ट सहजपणे मिळत नाही. तू क्रिकेटचा सन्मान करायला हवा. तुझे वजन कमी करायला हवे आणि यष्टीरक्षणावर अजून थोडी मेहनत घ्यावी. आम्हाला माहिती होते की त्याच्यात प्रतिभा आहे. तो एक खरा सामना विजेता खेळाडू आहे. अखेर त्याने आमच्या सर्व अपेक्षांना सत्यात उतरवले,” असे शास्त्रींनी शेवटी सांगितले.
चौथ्या कसोटीत संघाला अडचणीतून काढले बाहेर
चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या २०५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारत ५० षटकांत ५ बाद १२१ धावा अशा स्थितीत होता. परंतु पंतने सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येत ११८ चेंडूत १०१ धावांची खेळी केली. दरम्यान त्याने २ खणखणीत षटकार आणि १३ चौकार मारले. अखेरच ८४.१ षटकात जेम्स अंडरसनच्या चेंडूवर जो रुटने झेल घेत त्याला बाद केले. परंतु त्याच्या खेळीमुळे भारताने २५९ धावांपर्यंत मजल मारली होती. पुढे वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेलने दमदार भागिदारी रचत संघाचा डाव ३६५ धावांपर्यंत पोहोचला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
वाढदिवस विशेष: जेव्हा विवियन रिचर्ड्स यांनी कराचीतील मैदानावर आणले होते तुफान