भारत आणि इंग्लंड यांच्यातील बुधवारपासून (४ ऑगस्ट) सुरु झालेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले. भारतीय वेगवान गोलंदाजीने इंग्लंडच्या फलंदाजांना मैदानावर फार काळ टिकण्याची संधी दिली नाही. भारतीय गोलंदाजांच्या धारदार गोलंदाजीमुळे भारताने इंग्लंडला १८३ च्या माफक धावसंख्येवर बाद केले. भारताचा माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण गोलंदाजांच्या या कामगिरीमुळे खूप आनंदी दिसत आहे.
त्याने म्हटले आहे की, भारतीय संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील चुका सुधारल्या आहेत.
ईएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना लक्ष्मण म्हणाला, ‘बुमराहच्या पहिल्या षटकापासून भारताकडून हा एक चांगला प्रयत्न झाला होता. मला वाटते की जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत झालेल्या चुका त्यांनी दुरुस्त केल्या आहे आणि त्यासाठी नेट्सवर जाणे, सराव करणे, कमजोरीवर काम करणे हा एकमेव मार्ग होता.’
तो पुढे म्हणाला, ‘बुमराह आणि शमीने योग्य लेंथवरून गोलंदाजी केली, कारण इंग्लिश वातावरणात प्रभावी होणे महत्त्वाचे असते. कसोटी मालिका जिंकण्यासाठी संघाला अव्वल फॉर्ममध्ये असलेल्या दोन किंवा तीन गोलंदाजांची गरज असते आणि बुमराह आणि शमीकडून पहिल्या दिवशी आम्ही जे पाहिले ते विलक्षण होते.’
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बुमराहला एकही विकेट मिळाली नव्हती. मात्र, इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी बुमराहने चार विकेट घेतल्या. त्याच्या व्यतिरिक्त शमीनेही तीन इंग्लिश फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. भारताने इंग्लंडला १८३ धावांत गुंडाळले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशीचा खेळ पावसाच्या व्यत्ययामुळे लवकर संपला. दुसऱ्या दिवसाखेर भारताने पहिल्या डावात ४६.४ षटकात ४ बद १२५ धावा केल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक विजयानंतर गोलपोस्टवर का बसला श्रीजेश? स्वत:च केलाय खुलासा
‘ऑलिम्पिक २०२४ मध्ये क्रिकेटचाही समावेश करा’, इंग्लंड-भारत कसोटीदरम्यान प्रेक्षकाने केली मागणी