इंग्लंड दौऱ्यात (IND vs ENG) जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) वर्कलोडबाबत खूप चर्चा झाली. वर्कलोड मॅनेजमेंटच्या नावाखाली त्याला फक्त तीन कसोटी सामन्यांत खेळवण्यात आलं. पण आश्चर्याची गोष्ट अशी की, ज्या तीन सामन्यांत बुमराह प्लेइंग इलेव्हनमध्ये नव्हता, त्यापैकी दोन सामन्यांत भारताला विजय मिळाला. बुमराह हा जगातील सर्वोत्तम आणि धोकादायक गोलंदाजांपैकी एक मानला जातो.
जस्सी एकट्याने सामना पलटवण्याची ताकद ठेवतो आणि तो याआधीही अनेकवेळा टीमला संस्मरणीय विजय मिळवून देत आला आहे. मात्र, यंदा भारताची टीम बुमराहशिवाय अधिक प्रभावी दिसून आली आहे. मग तो कसोटी फॉरमॅट असो, वनडे किंवा टी-20. त्यामुळे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही की टीम इंडियाने (Team india) आता बुमराहशिवाय जिंकण्याची कला आत्मसात केली आहे.
इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत बुमराह तीन सामन्यांत खेळला. त्याच्या उपस्थितीत हेडिंग्ले आणि लॉर्ड्सला भारताला पराभवाचा सामना करावा लागला, तर मँचेस्टरमध्ये फलंदाजांच्या जोरावर सामना ड्रॉ करण्यात यश मिळालं. पण जस्सी ज्या दोन कसोट्यांत नव्हता, त्या दोन्ही सामन्यांत भारताने विजय मिळवला.
ही गोष्ट फक्त या मालिकेपुरती मर्यादित नाही, तर संपूर्ण 2025 मध्ये असंच चित्र पाहायला मिळालं. बुमराहने यावर्षी भारतासाठी फक्त 4 कसोटी सामने खेळले आणि त्यापैकी तीन सामन्यांत भारत पराभूत झाला, तर एक सामना ड्रॉ झाला. म्हणजे बुमराहच्या उपस्थितीत भारताला यावर्षी कसोटीत एकाही सामन्यात विजय मिळवता आलेला नाही.
आता जसप्रीत बुमराहशिवाय 2025 मध्ये तीनही फॉरमॅट मिळून भारताने एकूण 15 सामने खेळलेत. त्यापैकी 14 सामन्यांत भारताने विजय मिळवला आणि फक्त एकाच सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. चॅम्पियन्स ट्रॉफीचं विजेतेपदसुद्धा भारताने बुमराहशिवाय जिंकलं आणि 12 वर्षांचा आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवला.
बुमराह नसताना भारताला मिळालेला एकमेव पराभव इंग्लंडविरुद्ध टी-20 सामन्यात झाला. आकडे जरी जस्सीच्या विरोधात असले, तरी हे मान्य करावं लागेल की बुमराहचं महत्त्व भारतीय क्रिकेटमध्ये खूप मोठं आहे आणि तो एक सर्वात मोठा ‘मॅच विनर’ आहे.





