अवघ्या 20 दिवसांनंतर आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेचा घाट घातला जाणार आहे. क्रिकेटच्या या महाकुंभमेळ्याचा आनंद लुटण्यासाठी जगभरातील सर्व क्रिकेटप्रेमी सज्ज झाले आहेत. वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेला येत्या 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. मात्र, स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी विश्वचषकाशी संबंधित भारताच्या खास आकडेवारीविषयी जाणून घेऊयात…
आतापर्यंत भारताने विश्वचषकात किती सामने खेळले?
सर्वात पहिला वनडे विश्वचषक 1975मध्ये खेळला गेला होता. तेव्हापासून आतापर्यंत भारतीय संघाने विश्वचषकात एकूण 84 सामने खेळले आहेत. यातील 53 सामन्यात भारताला विजय मिळाला आहे, तर 29 सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. तसेच, 1 सामन्याचा निकाल लागला नाही आणि 1 सामना बरोबरीत सुटला होता. या सामन्यांमधील भारताची सर्वाधिक धावसंख्या ही 413 राहिली आहे. ही धावसंख्या भारताने बर्मुडा देशाविरुद्ध 2007च्या विश्वचषकात केली होती. तसेच, भारताची विश्वचषकातील सर्वात कमी धावसंख्या ही 125 आहे. ही धावसंख्या भारताने 2003च्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध केली होती. हा सामना भारत 9 विकेट्सने पराभूत झाला होता.
भारताची विश्वचषक स्पर्धेत भारतातील आकडेवारी
आता आपण भारताची वनडे विश्वचषक इतिहासातील भारतातील आकडेवारी पाहूयात. भारताने आतापर्यंत विश्वचषकातील 22 सामने भारतात खेळले आहेत. या 22 सामन्यांपैकी भारत 15 सामने जिंकण्यात यशस्वी ठरला आहे. तसेच, 6 सामन्यात भारत पराभूत झाला आहे. याव्यतिरिक्त 1 सामना बरोबरीत सुटला आहे. यादरम्यान भारताची सर्वोत्तम धावसंख्या 338 राहिली आहे, तर सर्वात कमी धावसंख्या 219 राहिली आहे.
भारताकडे विश्वचषकाचे दोन किताब
भारतीय संघ वनडे विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत 2 किताब जिंकण्यात यशस्वी ठरला आहे. भारताने सर्वात पहिला किताब विश्वचषक 1983मध्ये जिंकला होता. यावेळी भारताने कपिल देव (Kapil Dev) यांच्या नेतृत्वाखाली ही मोठी कामगिरी केली होती. त्यानंतर भारताने तब्बल 28 वर्षांनंतर 2011च्या वनडे विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले होते. हा विश्वचषक भारतात खेळला गेला होता. यावेळी भारताचा कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) होता.
वनडे विश्वचषक 2023विषयी थोडक्यात
स्पर्धेचा पहिला सामना गतविजेत्या इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघात खेळला जाणार आहे. तसेच, भारतीय संघ विश्वचषकातील आपल्या अभियानाची सुरुवात 8 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेन्नई येथील सामन्याने करेल. भारतीय संघाची धुरा यावेळी रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या खांद्यावर आहे. भारताने 2013च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर भारताला एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आली नाही. अशात चाहत्यांना रोहितसेनेकडून आयसीसी विश्वचषक जिंकण्याची आशा आहे. (team india has played 22 world cup matches in india, out of which they have won 15 matches)
हेही वाचा-
‘संपूर्ण जग पाकिस्तानला…’, Asia Cup 2023मधून PAK संघ बाहेर पडताच कडाडला शोएब अख्तर
पाकिस्तानच्या पराभवामुळे भारताला ICC ODI Rankingsमध्ये मोठा फायदा, रोहितसेनेने पटकावला ‘हा’ क्रमांक