इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील सामन्यांना जोरदार सुरुवात झाली आहे. स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात क्रिकेट चाहत्यांना रोमांचक सामना पाहायला मिळाला. चेन्नई सुपर किंग्स संघाने मुंबई इंडियन्स संघाला २० धावांनी पराभूत केले. ही स्पर्धा झाल्यानंतर युएई आणि ओमानमध्ये टी -२० विश्वचषक स्पर्धेचा थरार पाहायला मिळणार आहे. दरम्यान ही मोठी स्पर्धा पार पडल्यानंतर भारतीय संघाच्या मायदेशातील मालिकांना प्रारंभ होणार आहे. ज्याचे वेळापत्रक बीसीसीआयतर्फे जाहीर करण्यात आले आहे.
टी-२० विश्वचषक स्पर्धा झाल्यानंतर, भारतीय संघाला भारतात २०२१-२२ या एका वर्षभरात १४ टी -२० सामने, ४ कसोटी आणि ३ वनडे सामने खेळायचे आहेत. यादरम्यान भारतीय संघाचा सामना न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका या बलाढ्य संघासोबत होणार आहे. तर एप्रिल आणि मे २०२२ मध्ये चाहत्यांना आयपीएल २०२२ स्पर्धेचा थरार अनुभवायला मिळणार आहे. मायदेशातील मालिकांना नोव्हेंबर महिन्यात प्रारंभ होणार असून या मालिकांचा शेवट १९ जून रोजी होणार आहे.
आयसीसी टी -२० विश्वचषक स्पर्धेच्या ३ दिवसानंतर भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये टी -२० मालिकेला प्रारंभ होणार आहे. या मालिकेतील पहिला टी -२० सामना १७ नोव्हेंबर रोजी जयपूरमध्ये, दुसरा टी -२० सामना १९ नोव्हेंबर रोजी रांचीमध्ये तर तिसरा टी -२० सामना २१ नोव्हेंबर रोजी कोलकाताच्या मैदानावर पार पडणार आहे.
टी -२० मालिका झाल्यानंतर न्यूझीलंड संघाविरुद्ध २ कसोटी सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होणार आहे. मालिकेतील पहिला कसोटी सामना २५ नोव्हेंबर रोजी कानपूरमध्ये आणि दुसरा कसोटी सामना ३ डिसेंबर रोजी मुंबईमध्ये पार पडणार आहे.
वेस्ट इंडिज आणि श्रीलंका संघाविरुद्ध देखील रंगणार मालिका
मायदेशातील क्रिकेट हंगामात न्यूझीलंड नंतर वेस्ट इंडिज संघाविरुद्ध सामने रंगणार आहेत. वेस्ट इंडिजविरुद्ध ३ वनडे आणि ३ टी -२० सामने खेळले जाणार आहेत. वनडे मालिकेतील पहिला वनडे सामना ६ फेब्रुवारी रोजी अहमदाबादमध्ये, ९ फेब्रुवारी रोजी जयपूर आणि १२ फेब्रुवारी रोजी कोलकातामध्ये पार पडणार आहे.
यानंतर टी -२० मालिकेला प्रारंभ होणार आहे.टी -२० मालिकेतील पहिला सामना १५ फेब्रुवारी रोजी कटकच्या मैदानावर, दुसरा टी -२० सामना १८ फेब्रुवारी विशाखापट्टणम आणि तिसरा टी -२० सामना २० फेब्रुवारी रोजी त्रिवेंद्रममध्ये पार पडणार आहे.
त्यानंतर २५ फेब्रुवारी पासून भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना बेंगलोर आणि दुसरा कसोटी सामना ५ मार्च पासून मोहालीमध्ये पार पडणार आहे. तसेच श्रीलंका संघाविरुद्ध मोहाली, धर्मशाळा आणि लखनऊमध्ये अनुक्रमे १३, १५ आणि १८ मार्च रोजी टी -२० सामने पार पडणार आहेत.
तसेच एप्रिल महिन्यात इंडियन प्रीमियर लीग २०२२ स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. ज्याचे वेळापत्रक अजूनही जाहीर करण्यात आले नाही. ही स्पर्धा झाल्यानंतर भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. या दोन्ही संघांमध्ये ५ टी -२० सामन्यांची मालिका पार पडणार आहे. या मालिकेतील पहिला टी -२० सामना ९ जून रोजी चेन्नईमध्ये, दुसरा टी -२० सामना १२ जून रोजी बेंगलोरमध्ये, तिसरा टी -२० सामना १४ जून रोजी नागपूर तर १५ जून रोजी चौथा टी -२० सामना राजकोटमध्ये आणि अंतिम टी -२० सामना १९ जून रोजी दिल्लीमध्ये पार पडणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘रनमशीन’ कोहलीसाठी आजचा दिवस असेल खास, ‘या’ दोन मोठ्या विक्रामांवर असेल नजर