टी20 वर्ल्ड कप 2026 पूर्वी टीम इंडियाच्या अडचणी थांबण्याचे नाव घेत नाहीत. तिलक वर्मा आणि वॉशिंग्टन सुंदर आधीच दुखापतीमुळे संघाबाहेर आहेत, त्यातच आता आणखी एक स्टार फलंदाज जखमी झाला आहे. हा फलंदाज दुसरा कोणी नसून न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेत दमदार पुनरागमन करणारा ईशान किशन आहे. चौथ्या टी20 आंतरराष्ट्रीय सामन्याच्या टॉसच्या वेळी कर्णधार सूर्यकुमार यादवने सांगितले की, ईशानला ‘निगल’ (किरकोळ दुखापत) आहे आणि त्यामुळे तो प्लेइंग 11 चा भाग नाही.
न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत धमाकेदार कामगिरी करणारा ईशान किशन दुखापतीमुळे चौथा सामना खेळत नाहीये. कॅप्टन सूर्याने माहिती दिली की ईशानला दुखापत झाली आहे. मात्र, ही दुखापत किती गंभीर आहे, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही.
सूर्यकुमारने अक्षर पटेलच्या फिटनेसवरही अपडेट दिले आहे. सूर्याने सांगितले की, अक्षर अजूनही पूर्णपणे फिट होऊ शकलेला नाही आणि त्याला तंदुरुस्त होण्यासाठी आणखी थोडा वेळ लागेल. पहिल्या टी20 सामन्यात स्वतःच्याच गोलंदाजीवर चेंडू पकडण्याच्या प्रयत्नात अक्षर जखमी झाला होता.
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील चौथ्या टी20 सामन्यात भारतीय संघ एका बदलासह मैदानात उतरला आहे. ईशान किशन पूर्णपणे फिट नसल्यामुळे आजचा सामना खेळत नाहीये. ईशानच्या जागी अर्शदीप सिंगचे संघात पुनरागमन झाले आहे. भारतीय संघाने मालिकेत आधीच 3-0 अशी अजेय आघाडी घेतली आहे. गुवाहाटी येथे झालेल्या तिसऱ्या टी20 सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडचे 154 धावांचे लक्ष्य अवघ्या 10 षटकांत गाठले होते.






