यावर्षीचे आयपीएलचे मोसम सुरु झाल्यापासूनच भारतीय क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साह पाहायला मिळत आहेत. आयपीएल संपताच सुरु होणाऱ्या टी२० विश्वचषकामुळे हा आनंद द्विगुणित होणार आहे. नुकताच टी२० विश्वचषकासाठीचा संघ जाहीर करण्यात आला आहे. यावेळेला भारतीय क्रिकेटप्रेमींचे भारतीय संघासोबतच इतर संघांच्या कामगिरीवरही लक्ष असेल.
इतर संघांमधील अनेक नवनवीन खेळाडूंमुळे भारतीय संघातील खेळाडूंना आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. भारतीय संघाने २००७ साली महेंद्रसिंग धोनी याच्या कर्णधारपदाखाली टी२० विश्वचषक जिंकला आहे. त्यामुळे भारतीय संघासाठी इतक्या वर्षांनंतर हा विश्वचषक जिंकणे अत्यंत महत्वाचे ठरणार आहे. आत्तापर्यंतच्या टी२० विश्वचषकात काहीवेळा भारताची कामगिरी उत्तम, तर काहीवेळा निराशाजनक राहिली आहे. या सर्व कामिगिरींबद्दल पाहूया.
२००७ – विजेता संघ
२००७ साली दक्षिण आफ्रिकेमध्ये १२ संघासोबत प्रथम टी२० विश्वचषक खेळवण्यात आला. त्यावेळी भारतीय क्रिकेटप्रेमींकडून महेंद्रसिंग धोनी व त्याच्या संघामध्ये अनुभवाची कमतरता आहे, अशा पद्धतीने बोलले जात होते. स्कॉटलंड सोबतचा सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर, भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान सोबत सामना होता व ह्या सामन्यात बॉल आऊट या माध्यमातून भारताने ३-१ ने हा सामना जिंकला.
इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात युवराज सिंगने स्टुअर्ट ब्रॉडला ६ चेंडूंमध्ये ६ षटकार लगावले. नंतर भारताने दक्षिण आफ्रिका व ऑस्ट्रेलिया सारख्या दिग्गज संघाना हरवून अंतिम सामन्यात मजल मारली. अंतिम सामन्यात पाकिस्तानला हरवून प्रथम टी२० विश्वचषकावर नाव नोंदवले.
२००९ – साखळी फेरीत हार
टी२०चा दुसरा विश्वचषक इंग्लंडमध्ये घेण्यात आला. यात भारत बांग्लादेश व आयर्लंड संघांसोबतच्या गटात होता. या गटांमधील सामने जिंकल्यावर वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका व इंग्लंड संघांकडून हार मिळाली व भारताला विश्वचषकातून बाहेर पडावे लागले. पाकिस्तान संघाने लॉर्ड्स मैदानावर श्रीलंकेच्या संघाला हरवत विश्वचषक जिंकला.
२०१० – पुन्हा २००९ सालाची पुनरावृत्ती
२०१० सालचा टी२० विश्वचषक वेस्ट इंडिजमध्ये घेण्यात आला. अफगाणिस्तान व दक्षिण आफ्रिकेला गटांतील सामन्यात हरवत भारताने पुढील सामने जिंकण्याची तयारी केली, परंतु २००९ प्रमाणेच वेस्ट इंडिज, श्रीलंका व ऑस्ट्रेलिया संघाकडून हार पत्करावी लागली. यावर्षी इंग्लंड संघाने ऑस्ट्रेलिया संघावर विजय मिळवून प्रथम टी२० विश्वचषक जिंकला.
२०१२ – दुसऱ्या फेरीपर्यंत पोहोचण्याची मजल
२०१२ मध्ये टी२० विश्वचषक पहिल्यांदा आशियाई खंडात म्हणजे श्रीलंकमध्ये झाला होता. यावेळेला भारतीय संघाने चांगली कामगिरी केली होती. अफगाणिस्तान व इंग्लंड यांना हरवत दुसऱ्या फेरीमध्ये मजल मारली. इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात हरभजन सिंग व पियुष चावला या दोघांनी मिळून ६ विकेट्स घेतल्या. भारताने केलेले १४० धावा ऑस्ट्रेलियन संघाने १५ षटकांमध्ये पूर्ण करून भारताला हरवले. भारताने पाकिस्तान व दक्षिण आफ्रिका संघाला हरवले. परंतु गुणतालिकेत अपेक्षित संख्या नसल्यामुळे भारत उपांत्य फेरीत पोहोचू शकला नाही. यावर्षी वेस्ट इंडिजने यजमान असणाऱ्या श्रीलंकेला हरवले व विश्वचषक पटकावले.
२०१४ – उपविजेतेपद
२०१४ चा टी२० विश्वचषक बांग्लादेशमध्ये झाला होता. पाकिस्तान व वेस्ट इंडिजबरोबरच्या सामन्यात भारताला विजय मिळाला व यात अमित मिश्राचे श्रेय जास्त होते. या दोन्ही सामन्यात अमित मिश्राला सामनावीराचे पारितोषिक मिळाले. बांग्लादेश व ऑस्ट्रेलिया यांना हरवत भारत उपांत्य फेरी पर्यंत पोहोचला.
उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकाने १७२ धावांचे लक्ष भारतासमोर ठेवले. हे लक्ष भारताने अखेरच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूत पूर्ण केले. भारत विरुद्ध श्रीलंका या अंतिम सामन्यात भारताने जेमतेम १३० धावा केल्या, ज्यातील ७७ धावा विराट कोहलीने केल्या. श्रीलंकन संघाने १८ व्या षटकात १३१ धावा करून हा सामना व टी२० विश्वचषक जिंकला.
२०१६ – उपांत्यफेरी पर्यंत मजल
२०१६ चा टी२० विश्वचषक पहिल्यांदा भारताने आयोजित केला होता. प्रथम सामन्यात न्यूझीलंडकडून हरल्यानंतर भारताने पाकिस्तानला हरवत पुनरागमन केले. बांगलादेश व ऑस्ट्रेलियाला हरवत भारताला उपांत्यफेरी पर्यंत पोहोचण्यात यश आले. उपांत्यफेरीत भारताने वेस्ट इंडिजला १९२ धावांचे दमदार लक्ष दिले, परंतु वेस्ट इंडिजने हे लक्ष्य ७ विकेट्स राखून जिंकले व भारताचे अंतिम सामन्यात पोहोचण्याचे स्वप्न भंग पावले. वेस्ट इंडिजने हा विश्वचषक इंग्लंडवर ४ विकेट्स राखून विजय मिळवत जिंकला.
महत्त्वाच्या बातम्या –
‘मला क्रिकेट आवडत नाही…’, दिल्लीच्या पराभवानंतर युवराज सिंगच्या प्रतिक्रियेने वेधले सर्वांचेच लक्ष
सामना हारुनही दिल्लीनं जिंकली मनं! क्रिकेटविश्वातून अशा उमटल्या प्रतिक्रिया
सात धावासांठी तीन विकेट्सची आहुती! अखेर गगनचुंबी षटकार ठोकत कोलकाताचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश