भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी रविवार (8 डिसेंबर) हा दिवस अत्यंत वाईट होता. आज तीन भारतीय संघांनी वेगवेगळ्या टूर्नामेंटमध्ये सामने खेळले. मात्र तिन्ही सामन्यांमध्ये भारताचा पराभव झाला.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा 10 गडी राखून पराभव झाला. यानंतर महिला क्रिकेट संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात 112 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. तर दुबईत झालेल्या अंडर 19 पुरुष आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात गतविजेत्या बांगलादेशनं भारताचा 59 धावांनी पराभव करत विजेतेपद पटकावलं.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (ॲडलेड पिंक बॉल टेस्ट) – रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला ॲडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या पिंक बॉल कसोटीत 10 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. भारतीय संघाला डावानं पराभवाचा धोका होता, मात्र नितीश रेड्डीच्या लढाऊ खेळीमुळे भारत डावानं पराभूत होण्यापासून वाचला. या सामन्याच्या दोन्ही डावात भारतीय फलंदाजांना केवळ 81 षटकेच फलंदाजी करता आली. ऑस्ट्रेलियानं अवघ्या सात सत्रात विजय मिळवला, जो चेंडूंच्या बाबतीत भारताविरुद्धचा सर्वात छोटा कसोटी सामना आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (महिला एकदिवसीय सामना) – ऑस्ट्रेलियाच्या महिला संघानं रविवारी दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय महिला संघाचा 122 धावांनी पराभव केला. 75 चेंडूत 105 धावांची स्फोटक खेळी करणाऱ्या एलिस पेरीला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कारानं गौरविण्यात आलं. जॉर्जिया वॉल आणि एलिस पेरी यांच्या शतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत आठ गडी गमावून 371 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ 44.5 षटकांत 249 धावांवर गारद झाला. भारताकडून रिचा घोषनं सर्वाधिक 54 धावा केल्या.
भारत विरुद्ध बांगलादेश फायनल (अंडर 19 पुरुष आशिया कप) – गतविजेत्या बांगलादेशनं रविवारी फायनलमध्ये भारताचा 59 धावांनी पराभव करत अंडर-19 पुरुषांच्या आशिया चषकाचं विजेतेपद राखलं. भारत आठ विजेतेपदांसह स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करणाऱ्या भारतीय संघानं बांगलादेशला 49.1 षटकांत 198 धावांत गुंडाळलं होतं. भारताकडून युधजीत गुहा, चेतन शर्मा आणि फिरकीपटू हार्दिक राज यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. मात्र बांगलादेशच्या शानदार गोलंदाजीपुढे भारतीय फलंदाज अपयशी ठरले. संपूर्ण संघ 35.2 षटकात 139 धावांवर गारद झाला. भारताकडून कर्णधार मोहम्मद अमाननं सर्वाधिक 26 धावा केल्या.
हेही वाचा –
टीम इंडियाचा नवा ‘सिक्सर किंग’! पदार्पणातच मोडला सेहवागचा मोठा रेकॉर्ड
गुलाबी चेंडूच्या कसोटीतील ऑस्ट्रेलियाच्या वर्चस्वाचं कारण काय? शेवटचा पराभव कधी झाला होता?
या कारणामुळे रिषभ पंत मेगा लिलावात उतरला, मुख्य प्रशिक्षकांचा खळबळजनक खुलासा!






