---Advertisement---

भारताच्या मुख्य प्रशिक्षकाच्या प्रकरणात ‘नवा ट्विस्ट’, द्रविडने ऑफर न स्विकारल्याचा गांगुलीकडून खुलासा

On: शनिवार, ऑक्टोबर 23, 2021 10:58 AM
Sourav Ganguly
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघ सध्या आयसीसीच्या टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेच्या तयारीत व्यस्त आहे. ही स्पर्धा संपल्यानंतर भारतीय संघाचा विद्यमान कर्णधार विराट कोहली टी२० संघाचे नेतृत्तवपद सोडणार आहे. कोहलीबरोबरच संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचाही कार्यकाळ संपणार असल्याने बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात आहे. अशात माजी भारतीय क्रिकेटपटू राहुल द्रविड यांची या पदी वर्णी लागणार असल्याची चर्चा होती. परंतु आता बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी केलेल्या वक्तव्यावरुन या प्रकरणाने नवे वळण घेतले आहे.

नुकत्याच ‘आज तक’ला दिलेल्या एका मुलाखतीत गांगुलींनी द्रविड यांच्या मुख्य प्रशिक्षक बनण्याच्या शक्यतेवर भाष्य केले आहे. आपले माजी सहकारी द्रविड यांनी अद्यापही बीसीसीआयच्या प्रस्तावाचा स्विकार केलेला नाही, असे त्यांनी सांगितले आहे.

गांगुली म्हणाले की, “अजूनही द्रविड यांच्यासोबत भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी संपर्क झालेला नाही. त्यांना यासंबंधी अंतिम निर्णय घेण्यासाठी अजून काही वेळ पाहिजे आहे. द्रविड सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख आहेत आणि ते याला एक महत्त्वपूर्ण पद मानतात. जर त्यांची इच्छा असेल, तरच ते या पदासाठी अर्ज करतील आणि ही प्रकिया पूर्ण होण्यासाठी अजून खूप वेळ आहे. सध्या ते एनसीएचे प्रमुख आहेत आणि मला वाटते की भारतीय क्रिकेटमध्ये एनसीएची मोठी भूमिका राहिली आहे.”

“मी यापूर्वी त्यांच्याशी भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकासंदर्भात बोललो आहे. त्यावेळी त्यांनी जास्त रुची दाखवली नव्हती आणि माझ्या मते सध्याही स्थिती हीच आहे. त्यांनी काही वेळ मागितला आहे, बघू काय होते ते,” असेही त्यांनी म्हटले.

यापूर्वी बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने ‘इनसाईड स्पोर्ट्स’ला सांगितले होते की, “द्रविड यांनी होकार दिला आहे. त्यामुळे तेच भारतीय संघाचे भावी मुख्य प्रशिक्षक असतील. ते लवकरच त्यांचे एनसीएचे प्रमुखपद सोडणार आहेत.” यानंतर त्यांच्या सपोर्ट स्टाफमध्ये पारस महांब्रे गोलंदाजी प्रशिक्षक आणि विक्रम राठोड फलंदाजी प्रशिक्षक बनण्याची चर्चा होती. परंतु आता गांगुली यांच्या वक्तव्यानंतर या चर्चांवर पूर्णविराम लागल्याचे दिसते आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

भारत-पाकिस्तान सामना तोंडावर असताना बीसीसीआयचा ‘मोठा’ निर्णय, अय्यरसहित ४ खेळाडूंना पाठवले मायदेशी

भारत-पाक महामुकाबल्यात कोणाचे पारडे जड? कशी असेल खेळपट्टी? वाचा सविस्तर

आजपासून रंगणार सुपर १२ फेरीतील सामन्यांचा महासंग्राम, वेस्ट इंडिजविरुद्ध जुना हिशोब बरोबर करेल इंग्लंड

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---