भारतीय संघाने पुन्हा एकदा टी-20 (ICC T20 international world cup 2026) विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. गुरुवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या अटीतटीच्या सामन्यात भारताने इंग्लंडचा सात धावांनी पराभव केला. आता 8 मार्च रोजी विजेतेपदासाठी भारताचा सामना न्यूझीलंडशी (World Final between IND vs NZ) होईल. विशेष म्हणजे, अवघ्या दोन वर्षांपूर्वी भारताने हे जेतेपद पटकावले होते, तरीही यावेळच्या संघात अनेक खेळाडू असे आहेत जे पहिल्यांदाच विश्वचषकाची फायनल खेळणार आहेत.
2024 मध्ये रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारताने दक्षिण आफ्रिकेला हरवून विश्वचषक जिंकला होता. मात्र, त्यानंतर रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली. सध्या सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) भारतीय संघाचे नेतृत्व करत असून, आयसीसी स्पर्धेत कर्णधार म्हणून ही त्याची पहिलीच वेळ आहे.
यावेळच्या संघात असे अनेक खेळाडू आहेत जे गेल्या विश्वचषकात संघाचा भाग नव्हते. यामध्ये ईशान किशन, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर आणि वरुण चक्रवर्ती यांचा समावेश आहे. या सर्वांनी या स्पर्धेत किमान एक सामना खेळला आहे.
संजू सॅमसन 2024 च्या विश्वचषक संघात होता, पण त्याला एकही सामना खेळायला मिळाला नव्हता. मात्र, गेल्या दोन सामन्यांतील त्याची कामगिरी पाहता यावेळच्या फायनलमध्ये त्याचे खेळणे निश्चित मानले जात आहे. संजूप्रमाणेच मोहम्मद सिराज, यशस्वी जयस्वाल आणि युझवेंद्र चहल हे देखील गेल्या वेळी संघात असूनही एकही सामना खेळू शकले नव्हते. आता या खेळाडूंपैकी कोणाला प्लेइंग इलेव्हनमध्ये (Playing XI) स्थान मिळते, हे 8 मार्चला संध्याकाळी साडेसहा वाजता नाणेफेकीच्या वेळी स्पष्ट होईल.






