भारतीय संघाने शुक्रवारी (दि. 22 सप्टेंबर) ऑस्ट्रेलियाचा 5 विकेट्सने धुव्वा उडवला. गोलंदाजीत मोहम्मद शमीपुढे ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी गुडघे टेकले, तर फलंदाजीत भारताच्या चार फलंदाजांनी अर्धशतक झळकावले. पहिल्या वनडे सामन्यात मिळालेल्या विजयामुळे भारत वनडे क्रिकेटमध्ये जगातील अव्वल क्रमांकाचा संघ बनला आहे. यासोबतच राहुलच्या नेतृत्वात भारतीय संघाने मोहाली येथील आयएस बिंद्रा स्टेडिअमवर 27 वर्षांपासूनचा दुष्काळही संपवला.
प्रतीक्षा संपली
केएल राहुल (KL Rahul) याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने शुक्रवारी मोहाली (Mohali) येथील मैदानावर 27 वर्षांचा दुष्काळ संपवून टाकला. खरं तर, भारतीय संघाला मोहालीच्या आयएस बिंद्रा स्टेडिअमवर (IS Bindra Stadium) ऑस्ट्रेलियाविरुद्ध 1996नंतर पहिल्यांदाच विजय मिळवता आला. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघ 6 वेळा एकमेकांसमोर आले आहेत. यात भारतीय संघाने 2 वेळा, तर ऑस्ट्रेलियाने 4 वेळा विजय मिळवला आहे.
पहिल्या वनडेतील विजय ‘ऐतिहासिक’
मोहालीच्या मैदानावर मिळालेला विजय भारतासाठी ऐतिहासिक ठरला. या विजयासह भारतीय संघ क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात जगातील अव्वल संघ बनला आहे. भारताने पाकिस्तानला पछाडत वनडे क्रिकेटची बादशाहत मिळवली आहे. या पराभवामुळे ऑस्ट्रेलिया संघालाही नुकसान सहन करावे लागले आहे. त्यांची वनडे रँकिंगमध्ये तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे.
शमीने लुटली मैफील
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेत मोहम्मद शमी (Mohammed Shami) याने फलंदाजांना चांगलाच त्रास दिला. त्याने आपल्या वनडे कारकीर्दीतील सर्वोत्तम स्पेल टाकत 51 धावा खर्च केल्या आणि 5 ऑस्ट्रेलियन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. यामध्ये स्टीव्ह स्मिथ आणि मिचेल मार्श यांच्याही विकेटचा समावेश होता. शमीला त्याच्या खास प्रदर्शनासाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
भारताचा सोपा विजय
शमीच्या शानदार गोलंदाजीमुळे भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला पहिल्या वनडेत 276 धावांवर रोखले. यानंतर 277 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने 48.5 षटकात 5 विकेट्स गमावत 281 धावा केल्या. यातील विजयी षटकार राहुलने मारला. भारताकडून ऋतुराज गायकवाड आणि शुबमन गिल यांनी पहिल्या विकेटसाठी 142 धावांची भागीदारी रचली. ऋतुराज 71, तर शुबमन 74 धावा करून बाद झाला. तसेच, कर्णधार राहुल 58 धावांवर नाबाद राहिला आणि सूर्यकुमार यादव यानेही अर्धशतक झळकावले.
या विजयासह भारताने मालिकेत 1-0ने आघाडी घेतली आहे. या विजयानंतर भारतीय संघाला दुसरा सामना 24 सप्टेंबर रोजी इंदोरच्या होळकर क्रिकेट स्टेडिअमवर खेळायचा आहे. (team india registered their first win against australia after 27 years in mohali kl rahul hit six)
हेही वाचा-
भारतीय संघाचा ‘सूर्य’ 19 महिन्यांनी उगवला! ‘मिस्टर 360’ने केला खास पराक्रम, एकदा वाचाच
‘अतंत्य जड अंत:करणाने सांगावे लागत आहे…’, World Cup 2023मधून बाहेर होताच पाकिस्तानी गोलंदाज भावूक