भारतीय संघाबद्दल मोठी बातमी समोर येत आहे. येत्या ९ जूनपासून सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ५ सामन्यांच्या टी२० मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघाचा कर्णधार केएल राहुल दुखापतग्रस्त झाल्यामुळे तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेतून बाहेर पडला आहे. फक्त राहुलच नाही, तर त्याच्यासोबतच चायनामन फिरकी गोलंदाज कुलदीप यादवही दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर पडला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयकडून याची अधिकृत पुष्टी करण्यात आली आहे.
नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या अनुपस्थितीत केएल राहुल (KL Rahul) याच्याकडे संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले होते. मात्र, तोदेखील दुखापतीमुळे या मालिकेचा भाग नसेल. त्यामुळे आता राहुलच्या अनुपस्थितीत रिषभ पंत (Rishabh Pant) भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. याची माहिती बीसीसीआयने दिली आहे. खरं तर रिषभ पंतला या मालिकेसाठी उपकर्णधार बनवण्यात आले होते. मात्र, उपकर्णधारपदाची जबाबदारी हार्दिक पंड्याच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, पंड्याने आयपीएल २०२२मध्ये गुजरात टायटन्स संघाला विजेतेपद जिंकून दिले होते.
बीसीसीआयने ट्वीट करत सांगितले आहे की, “उजव्या मांडीच्या दुखापतीमुळे केएल राहुल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेतून बाहेर पडला आहे, तर कुलदीप यादव काल संध्याकाळी नेटमध्ये फलंदाजी करताना उजव्या हाताला मार लागल्याने टी२० मालिकेला मुकणार आहे.”
https://twitter.com/BCCI/status/1534523444900990978
निवड समितीने केएल राहुल आणि कुलदीप यादव यांच्या जागी कोणालाही संघात सामील केले नाही. दोघेही आता राष्ट्रीय क्रिकेट अकादमी म्हणजेच एनसीए येथे उपचार घेतील.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी असा असेल भारतीय संघ
रिषभ पंत (कर्णधार/यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), वेंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक.
मितालीला आवडतात ‘हे’ पुरुष क्रिकेटपटू, सोशल मीडियावर केलं होतं जाहीर





